विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वाचा ठराव मागे घ्यावा म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली तरी त्याचा फारसा उपयोग होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिवेशनात एकत्र राहू नये या उद्देशाने अविश्वाच्या ठरावावर राष्ट्रवादीला मदत होईल, अशी खेळी भाजपकडून केली जाण्याची चिन्हे आहेत.
देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या विरोधातील अविश्वाचा ठराव चर्चेला येऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीने हा प्रस्ताव मांडला असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीने हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती चव्हाण यांनी पवार यांना केली. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २७ तर काँग्रेसचे २० आमदार आहेत. मात्र १५ वर्षे सत्तेत असताना काँग्रेसचे आमदार जास्त असतानाही विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते याकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्ष वेधले आहे. तर संख्याबळ आमचे जास्त आहे, यामुळे आमचा या पदावर दावा असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
पवार जुने हिशेब चुकते करणार ?
काँग्रेसच्या राजकारणात शिवाजीराव देशमुख हे नेहमी शरद पवार विरोधक म्हणून ओळखले जातात. देशमुख यांनी कायम दिल्लीच्या इशाऱ्यावरून पवार यांच्या विरोधात राजकारण केले. त्याचे उट्टे काढण्याची संधी शरद पवार सोडणार नाहीत, असे बोलले जाते. अविश्वासाचा ठराव मंजूर करण्याऐवजी देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा हा तोडगा राष्ट्रवादीला मान्य होऊ शकतो. देशमुख यांचे सभापतिपद कायम ठेवायचे असल्यास विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसने सोडून ते राष्ट्रवादीला द्यावे, असा राष्ट्रवादीचा पर्याय आहे. सभापतिपदाच्या बदल्यात काँग्रेसला उपसभापतिपद देऊ, असा पर्याय राष्ट्रवादीने मांडल्याचे सांगण्यात येते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2015 रोजी प्रकाशित
अशोक चव्हाण-पवार भेट; तरी अविश्वासावर राष्ट्रवादी ठाम
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वाचा ठराव मागे घ्यावा म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली तरी त्याचा फारसा उपयोग होण्याची शक्यता कमी आहे.

First published on: 09-03-2015 at 02:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan meets ajit pawar over assembly budget session