scorecardresearch

“भाजपाकडूनच टिपू सुलतानच्या नावाचा वापर;” आंदोलनावर अस्लम शेख यांची प्रतिक्रिया

मैदानाचं उद्घाटन होऊ न देण्यासाठी भाजपाकडून हा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप अस्लम शेख यांनी केला.

मालाड मधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येणार आहे. त्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. आज संकुलाबाहेर भाजपा आणि बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. भाजपा आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला विरोध करण्यात येत आहे. देशात एपीजे अब्दुल कलामसारखे लोक होऊन गेलेत, त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली.

टिपू सुलतान यांच्या नावावरून ७० वर्षांत कधीच वाद झाला नाही. भाजपाला विकास नकोय, ते नावांवरून राजकारण करतात. भाजपा केवळ विरोध दर्शवण्यासाठी टिपू सुलतान यांच्या नावाचा वापर करत आहे. भाजपाचा विकासाला विरोध आहे. त्यामुळे ते लोकांना आंदोलन करायला लावत आहेत. ज्या झोपडपट्टीच्या जागेवर एक चांगलं क्रीडा संकुल उभारलं गेलं, परंतु त्याचं कौतुक न करता नावावरून विरोध होतोय,” असं अस्लम शेख म्हणाले.

सध्या मुद्दा काय आणि आंदोलन कोणत्या मुदद्यावर सुरू आहे, हाच प्रश्न मला पडतोय, असं अस्लम शेख म्हणाले. टिपू सुलतान यांचं नाव सर्वप्रथम भाजपाकडून २०११मध्ये देण्यात आलं होतं, असंही ते म्हणाले. खेळासाठी उभारण्यात आलेल्या मैदानाचं उद्घाटन होऊ न देण्यासाठी भाजपाकडून हा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप अस्लम शेख यांनी केला.

मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यास विरोध; भाजपा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

दरम्यान, आंदोलनकर्ते आक्रामक झाल्याने घटनास्थळी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात पोहोचले आहेत. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अस्लम शेख जाणीवपूर्वक टिपू सुलतानचं नाव क्रीडा संकुलाला देत आहेत, असं आंदोलक म्हणाले. जेव्हा पर्यंत या संकुलाचं नाव बदललं जात नाही, तोपर्यंत या संकुलाचं उद्घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, त्यांच्या भूमीत टिपू सुलतान सारख्या व्यक्तीचं नाव देणं, म्हणजे अपमान आहे, तुम्हाला इथे हिंदूंना राहू द्यायचं नाही का, असा सवाल आंदोलकांनी केला.

अस्लम शेख हे अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यांनी मालवणी परिसराचं पाकिस्तान केलंय. ते हिंदूंना या परिसरातून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. बजरंग दल आणि भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. आंदोलकांनी बस थांबवत चाकातील हवा काढून टाकली. बसमधील प्रवाशांना रस्त्यावर थांबावं लागतंय. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लावलेले बॅनर आणि फलक आंदोलकांनी फाडून टाकले आहेत. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aslam shaikh slams bjp for using tipu sultan name for politics over malad sports complex hrc