मालाडमधील एका क्रिडा संकुलाच्या नावावरून भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी असा वाद पेटलाय. या नावाला भाजपासह बजरंग दलाने जोरदार विरोध केला असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भाजपाने या क्रिडा संकुलासमोर आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. मात्र हे आंदोलन भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलं असून यापूर्वी भाजपाच्या नेत्यांनीच वीर टिपू सुलतान असं एका रस्त्याचं नामकरण केल्याचा दावा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलाय.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अस्लम शेख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार पलटवार केला. भाजपाने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे. ज्या भाजपा नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी विचारला आहे. आता भाजपच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

“भाजपाचे जे वरिष्ठ नेते या नावाला विरोध करत आहे त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या नगरसेवकांना आणि सध्याच्या आमदाराला विचारलं पाहिजे की तुम्ही आपल्या मतदारसंघामधील या रस्त्याला वीर टिपू सुलतान असं नाव का दिलं?”, असा प्रश्न अस्लम शेख यांनी उपस्थित केला. “निवडणुका आल्या म्हणून तुम्हाला हे सर्व दिसत आहे. यापूर्वी का नाही विरोध केला. हे मैदान समान्यांसाठी करण्यात आलेलं आहे. आज लोकांना प्रगती हवी आहे. येथील जनतेला स्पोर्ट्स कॉम्पलेक्स मिळणार आहे. नाव बदली करा, नावाला विरोध करा या गोष्टी योग्य नाहीत, कारण लोकही याला कंटाळलेत,” असंही अस्लम शेख म्हणालेत.

“के इस्ट आणि के वेस्ट वॉर्डामध्ये भाजपाच्या नगरसेवकांनी नावं सुचवलं आहे. सध्या असणारे आमदार आणि नगरसेवक यांनी या नावाला अनुमोदन दिलंय. महापौरांनी याबद्दल माहिती दिली आहे. पण एवढं नक्की आहे की भाजपाने मुंबईमध्ये वीर टिपू सुलतान असं रस्त्याचं नामकरण केलेलं आहे. ते पास झालेलं आहे. ते कधीही मिटू शकत नाही,” असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्रजांच्याविरोधात लढत लढत ज्यांनी आपला जीव दिला ते वीर टिपू सुलतान होते. या मैदानाच्या नावापेक्षा येथे काय सुविधा आहेत, मुलांना काय फायदा होणार याचा विचार करावा. तुम्ही नावावर जाऊ नका काम बघा, असा सल्लाही अस्लम शेख यांनी दिलाय.