हाजी अली येथे ऑडी गाडीला धडक देणाऱ्या ऑस्टीन मार्टीन गाडीचा चालक कोण या रहस्यावर अखेर पडदा पडला आहे. या प्रकरणातील फिर्यादीने बुधवारी बन्सीलाल जोशी हेच चालक असल्याचे ओळखले असून तसा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दिला आहे.
आठ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास हाजी अली येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या आलिशान ‘ऑस्टीन मार्टीन’ गाडीने एका ‘ऑडी’ला धडक दिली होती. या अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी ‘ऑडी’ गाडीचे नुकसान झाले होते. या अपघातानंतर गाडीचा चालक पळून गेला होता. कोटय़ावधी रुपयांची ही गाडी रिलायन्स कंपनीच्या मालकिची होती. दुसऱ्या दिवशी बन्सीलाल जोशी (५३) हे गांवदेवी पोलीस ठाण्यात हजर झाले व आपणच गाडी चालवत होतो, असा जबाब त्यांनी दिला.
मात्र फिर्यादी फोरम रुपारेल (२५) हिने त्यांना ओळखले नव्हते. जोशी अन्य कुणालातरी वाचवत आहेत, अशी चर्चा होती. रुपारेलही आपले जबाब बदलत होती त्यामुळे या प्रकरणाबद्दल गूढ निर्माण झाले होते. पोलिसांनी गाडीच्या चाकाचे ठसेही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. बुधवारी मात्र रुपारेलने न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे जोशीच गाडी चालवत होते, असा जबाब दिला. त्यामुळे या प्रकरणात जोशी यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.