भगवान गौतम बुद्धांचा अस्थिकलश आपल्या घरी दर्शनासाठी ठेवणारे मनसे आमदार राम कदम यांच्यासह ३० जणांवर भारिपच्या तीन कार्यकर्त्यांना मारहाण करणे, अपहरण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्कसाइट पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून सोमवारी उशिरापर्यंत कदम यांना अटक करण्यात आलेली नव्हती.
भगवान गौतम बुद्धांचे अस्थिकलश श्रीलंकेहून आणल्याचा दावा करत मनसे आमदार राम कदम यांनी तो आपल्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवला होता. मात्र हे गौतम बुद्धांचे अस्थिकलश असणे शक्य नसून हा बोगस प्रकार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला होता. त्याबाबत रविवारी महासंघाचे रोहित तांबे, रितेश लांडगे आणि रवींद्र मोरे हे तीन कार्यकर्ते पार्कसाइट पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेले होते. तेथून ते घरी परतत असताना त्यांना कदम यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातच अडवून कदम यांच्या बंगल्यावर आणले. तेथे कदम आणि त्यांच्या ३० सहकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप तांबे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या तिघांवर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे एवढी मारहाण होऊनही पार्कसाइट पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद केली होती.
याविरोधात वातावरण तंग झाले आणि भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयात भेट देऊन कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर पार्कसाइट पोलिसांनी कदम आणि त्यांच्या ३० सहकाऱ्यांवर जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी दलित आदिवासी अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आंबेडकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सोमवारी राम कदम यांच्या घरावर मोर्चाही काढला होता. मात्र सोमवारी उशिरापर्यंत कदम यांना अटक झाली नव्हती. मात्र त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atrocity against ram kadam
First published on: 22-04-2014 at 03:58 IST