तुम्ही एखादे मासिक वाचत असाल आणि त्यातील जाहिरातीतील एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करावयाची असेल तर ‘चष्मा’ घाला आणि खरेदी करा! समोर दिसणाऱ्या वस्तूची संपूर्ण माहिती केवळ एका ‘टच’वर उपलब्ध करून देणारा ‘ऑगमेंटिक रिअ‍ॅलिटी’ची सुविधा असलेला चष्मा लवकरच बाजारात येत आहे. सहावी जाणीव अर्थात ‘सिक्स्थ सेन्स’चा शोध लावणारा भारतीय संशोधक आणि सध्या ‘सॅमसंग’च्या संशोधन विभागाचा प्रमुख प्रणव मेस्त्री याने या अद्भूत चष्म्याची झलक रविवारी आयआयटी मुंबईतील ‘टेकफेस्ट’मध्ये दाखवली.
प्रणव मेस्त्रीच्या विविध संशोधनांची झलक पाहताना मुले भारावून गेली. सन २०११ मध्ये ‘ऑगमेंटिक रिअलिटी’वर आधारित एक चष्मा तयार केला असून तो लवकरच बाजारात येणार आहे. हा चष्मा घातला की समोर असलेल्या वस्तूची सर्व माहिती, त्याची बाजारातील किंमत तुम्हाला डोळ्यांसमोर उपलब्ध होते. याशिवाय यामध्ये एक असे बटनही देण्यात आले आहे की ज्याचा वापर केल्यावर तुम्ही ती वस्तू खरेदीसाठी नोंदणी करू शकता. याबाबत अधिक बोलणे मेस्त्री यांनी टाळले कारण यामध्ये हक्कांचा प्रश्न होता. प्रणव आणि त्यांच्या टीमने केलेल्या विविध संशोधनांच्या चित्रफिती यावेळी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. संशोधनासाठी अपघात, गरज, समस्यांवर उत्तरे शोधण्याची तयारी, प्रोत्साहन देणे आणि ध्येयदृष्टी असणे गरजेचे असल्याचे प्रणवने विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यार्थ्यांची तोबा गर्दी
‘आयआयटी’चा माजी विद्यार्थी आणि ‘टचस्क्रीन’पासून ते भारतीय भाषांचा मोबाइलमधील वापर किंवा घडाळय़ातील फोन या सर्व गोष्टींचा शोध घेणाऱ्या प्रणव मेस्त्रीची एक झलक पाहण्यासाठी मुलांनी तोबा गर्दी केली होती. सुमारे १५०० क्षमता असलेला दीक्षांत सभागृह पूर्ण भरले होते. इतकेच नव्हे तर तो निघाल्यावर त्याच्या गाडीच्या मागेही विद्यार्थी धावत होते.
रामायण-महाभारत संशोधनासाठी प्रेरणा देतात
रामायण-महाभारत हे दोन मोठे ग्रंथ तुम्हाला संशोधनासाठी प्रेरणा देत असतात. यामध्ये वापरण्यात आलेली विविध तत्त्वे आणि संकल्पना आताच्या विविध संशोधनामध्ये पाहवयास मिळतात. आपल्या देशात संशोधनास पोषक वातावरण नाही असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात तसे नसून जिथे आव्हाने जास्त आहेत तिथेच संशोधनालाही जास्त वाव असतो.
प्रणव मेस्त्री