रिक्षाचालक-मालक यांच्या विविध मागण्यांसाठी २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून राज्यभरातील सुमारे साडेसात लाख रिक्षाचालकांनी ७२ तासांचे ‘बंद आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना संयुक्त कृती समितीचे नेते शरद राव यांनी सोमवारी ही घोषणा केली.
परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या आश्वासनांना भुलून गेल्या वेळी जाहीर केलेले बंद आंदोलन मागे घेणे ही चूकच होती. मात्र आता मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही. गेल्या वेळी आंदोलनाची हाक दिल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला सबुरीचे धोरण अवलंबण्याची विनंती केली होती. त्या वेळी त्यांचा मान ठेवत आम्ही आंदोलन मागे घेतले होते. मात्र आता आधी आंदोलन, मगच चर्चा होईल, असा इशारा राव यांनी दिला.
मुंबईच्या रस्त्यांवर एक लाख रिक्षा धावतात, असे म्हणणाऱ्यांनी एकदा वास्तव पडताळून पाहावे. मुंबईतील ३४ हजार रिक्षांचे परवाने मृत आहेत. त्याशिवाय दर दिवशी किमान तीन ते चार हजार रिक्षा दुरुस्तीमुळे बंद असतात. त्यामुळे प्रत्यक्षात फक्त ६० हजार रिक्षाच मुंबईकरांच्या सेवेत धावतात. त्यामुळे परिवहन विभागाने मृत परवाने पुनर्जीवित करण्याबरोबरच एक लाख नवीन परवाने द्यावेत, अशीही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.  इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करणे सहज सोपे आहे. तसेच हे मीटर लवकर बिघडत असल्याने रिक्षावाल्यांना भरुदड पडतो, असे या समितीचे म्हणणे आहे.
१ मेपासूनची दरवाढ विनाविलंब करावी, रिक्षावाल्यांना ‘पब्लिक सर्व्हट’चा दर्जा द्यावा, रिक्षावाल्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना व्हावी, रिक्षावाल्यांना म्हाडाच्या वसाहतींमध्ये घरे द्यावीत, अशा काही प्रमुख मागण्या कृती समितीने केल्या आहेत.