सुधारित श्रेयांकाधारित श्रेणीचा वापर, प्रथम वर्ष पदवीला नवा अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होत असून, सुधारित श्रेयांकाधारित श्रेणी पद्धतीचा (सीबीजीएस) वापर होणार आहे. यानुसार बीए, बीकॉम आणि बीएस्सी या पारंपरिक अभ्यासक्रमासाठी अंतर्गत २५ गुणांची परीक्षा रद्द होत आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आता थेट १०० गुणांची परीक्षा द्यावी लागेल. मात्र स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी अंतर्गत परीक्षा सुरूच राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली.
पारंपरिक अभ्यासक्रमासाठी २५ गुणांची अंतर्गत परीक्षा होत असे. यात १५ गुण तोंडी परीक्षा, तर वर्तणूक व उपस्थिती यांचे अनुक्रमे ५-५ गुण दिले जात. यापुढे हे गुण रद्द होणार आहेत. यामुळे या गुणांमध्ये महाविद्यालयात होणारे गैरप्रकार बंद होतील.
पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका आता विद्यापीठाकडून तयार केल्या जाणार असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर २०१६-१७ला पदवीच्या प्रथम वर्षांला नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. विद्यापीठाने सर्व शाखांचे अभ्यासक्रम बदलण्याचे ठरविले असल्याचेही डॉ. देशमुख यांनी प्राचार्य आणि विभागप्रमुखांच्या बठकीत सांगितले. कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार संधी लाभाव्यात यासाठी विद्यापीठाकडून पहिल्यांदाच शेवटच्या सत्रात प्रत्यक्ष प्रकल्प ही संकल्पना राबविली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महाविद्यालयांमध्ये सक्षम समित्या
महाविद्यालयांमध्ये सक्षम समित्याही तयार करण्यावर विशेष भर दिला जात आहे. प्रत्येक महाविद्यालयांध्ये तक्रार समिती, अॅण्टी रॅिगग समिती इत्यादी समित्या कार्यरत करण्याचे आवाहन बठकीला उपस्थित प्राचार्याना आणि विभागप्रमुखांना डॉ. देशमुख यांनी केले. याचबरोबर महाविद्यालयांनी शैक्षणिक परीक्षण आणि नॅक मूल्यांकन करून घेण्यावरही विशेष भर देण्याचेही डॉ. देशमुख यांनी प्राचार्याना सांगितले.