मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१, अर्थात बाबासाहेबांची जयंती ते महापरिनिर्वाणदिन  या कालावधीत वीजजोडणी कार्यक्रम राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीकरिता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.  ५०० रुपये इतकी अनामत रक्कम जमा करायची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ दिवसांत वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल.