कुख्यात अमली पदार्थाची तस्कर बेबी पाटणकरशी व्यवहार करून तिला पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच पोलिसांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
 अटक केलेल्या पोलिसांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, हवालदार यशवंत पार्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम माने आणि पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग यांचा समावेश आहे. त्यांना गेल्या आठवडय़ात गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आरोपींचा अमलीपदार्थाच्या व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्याने त्याच्या तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.