मुंबई : आगामी बकरी ईदसाठी राज्यात प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. ईदच्या काळात गुरांचे बाजार बंद ठेवण्याबाबत गोसेवा आयोगाने काढलेले आदेश रद्द करण्याची मागणी मुस्लीम आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. या संदर्भात नव्याने आदेश काढण्यात येणार आहे.
येत्या शनिवारी बकरी ईद असून, त्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईसह राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ जून ते ८ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेल्या पत्रावरून वाद निर्माण झाला आहे. राज्यात गोवंश हत्यांना कायद्यानुसार बंदी आहे. मात्र गोवंश हत्येच्या नावाखाली राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे बेकायदा आदेश आयोगाने दिले आहेत. यामुळे ईदच्या कुर्बानीला बकरी मिळणे अवघड झाले असून मुस्लिमांमध्ये याबाबत नाराजी असल्याची माहिती आमदारांनी दिली. यावर नव्याने आदेश काढला जाईल, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आल्याचे काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी सांगितले.
गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, हप्ते घेतात, वाहन चालकांना मारहाण करतात. अशी बेकायदा कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सांगितले. दरम्यान, गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी मात्र आधीच्या आदेशात काहीही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले. आमचा संबंध फक्त गोधनाशी असल्याचे ते म्हणाले.
समन्वयाने काम करण्याच्या सूचना
मुंबईतील देवनार कत्तलखान्यातील कत्तलीचे वाढवलेले शुल्क कमी करण्यात यावे. देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करावे आणि मुंबईत मांस मार्केटचे पूर्व, पश्चिम आणि उपनगर असे विकेंद्रीत पद्धतीने वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. त्यावर राज्यात सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था नेहमीच उत्तम राखली जाते. त्याचप्रमाणे आगामी ईदसाठीही शासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असून, या काळात कायदा व सुव्यवस्था राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले.