महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे आदेश; सेनेशी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात करण्यासाठी पावले टाकावीत, असे आदेश नगरविकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री उशिरा ‘लोकसत्ता’ला सांगितले. पण शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या मालमत्ता स्मारकासाठी वापरण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे असलेले र्निबध, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य काहींचा विरोध यामुळे स्मारकाचा प्रश्न न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०१५ रोजी महापौर बंगल्यातील स्मारकाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केली होती. त्यानंतर बरेच दिवस काहीच हालचाल झाली नाही. सरकारकडून कोणतेही आदेश नसल्याने आयुक्तांनी कार्यवाही केली नाही, तर मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्यावर महापालिका आयुक्तांनी पावले टाकायची आहेत, असे सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात येत होते. या संदर्भात सरकार आणि महापालिकेकडून चालढकल होत असल्याने ‘लोकसत्ता’ने काही दिवसांपूर्वी वृत्त दिले होते. त्यानंतर शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तातडीने पावले टाकण्याची विनंती केली होती. या पत्रावर ‘नियमानुसार कार्यवाही करावी,’ असा शेरा लिहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे ते पाठविले होते.

शासकीय व निमशासकीय मालमत्ता स्मारकासाठी वापरण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार र्निबध आहेत. महापौर बंगला ही पुरातन वास्तू असून कायदेशीर तरतुदींनुसार स्मारकासाठी वापर करण्यात अडथळे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यास जोरदार विरोध केला असून स्मारकासाठी पावले टाकण्यास सुरुवात झाल्यावर हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

या पाश्र्वभूमीवर देसाई यांच्या पत्रावरील मुख्यमंत्री फडणवीस यांचा शेरा महत्त्वाचा होता आणि कायदेशीर अडचणींमुळे आयुक्तांनी काहीच निर्णय घेतला नव्हता. पण शिवसेनेच्या सरकारवरील दबावामुळे आणि २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पावले टाकली आणि नगरविकास विभागाला आयुक्तांना आदेश जारी करण्याच्या सूचना दिल्या. हे आदेश शुक्रवारी आयुक्तांकडे जातील, असे मुख्यमंत्र्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

  • शिवसेनाप्रमुखांचे स्मारक आणि अन्य मुद्दय़ांवरही शिवसेनेला दुखावू नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.
  • शिवसेनेच्या पाठिंब्यावर सरकार असताना शक्यतो वाद टाळावा आणि सरकार सुरळीत चालावे, असा त्यांचा कल आहे. त्यामुळे  स्मारकाचे काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal thackeray memorial to be built at mumbai mayor bungalow said cm
First published on: 22-01-2016 at 03:52 IST