कुणी म्हणत होतं, साहेबांना झंझावात, कुणी म्हणाले वादळ. कुणी व्यंगचित्रकाराला वाखाणले, तर कुणाचा होता, तो हिंदूहृदयसम्राट. कुणी उपमा दिली ‘वक्ता दशसहस्त्रेषु’, ‘सहस्त्रकातील युगपुरूष’, कुणाच्या लेखी होता, तो सह्य़ाद्रीचा सुपुत्र. लाखो हृदयातील प्रेम वाटय़ाला आलेल्या महानायकासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता, तहानलेले, भुकेले तासन्तास कशी वाट पाहू शकतात, याचा प्रत्यय आज आला. महानायकाची या शतकातील विक्रमी गर्दीची अंत्ययात्रा त्याचीच साक्ष देत होती. लाखोंच्या डबडबल्या डोळ्यांमधून आणि व्याकुळ मनातून एकच भावना व्यक्त होत होती, ‘साहेब, तुम्ही आमच्या डोळयांना दिला अग्नि, अन् आज पाणी.’
शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने आधारवड हरपल्याची सर्वाचीच भावना होती. तो शोक प्रत्येक जण आपल्या शब्दातून आणि कृतीतून व्यक्त करीत होता. दादर, शिवसेनाभवन, शिवाजी पार्कचा परिसर आणि अंत्ययात्रा मार्गावर हजारो बॅनर आणि फलक लावले गेले होते. शिवसेनाप्रमुखांची वेगवेगळ्या छबीतील छायाचित्रे विलक्षण बोलकी होती. आपल्या अनुयायांचे प्रेम जणू ती अनुभवत होती. गर्दीतील प्रत्येक जण सांगत होता, ‘साहेब, तुम्ही जागवलंत, जगवलात, मराठी माणूस, घडवलात महाराष्ट्र आणि नवा इतिहास’.
शिवसेनाप्रमुख दुरावल्यावर काहींनी आपल्या ‘विठ्ठलाला अखेरचा दंडवत’ घातला, तर काहींनी ‘देश पोरका झाला,’ ही भावना व्यक्त केली. घराघराच्या गॅलरीत, गच्चीवर, झाडांवर, रस्त्यावर उभा असलेला प्रत्येकजण आपली श्रध्दांजली लाडक्या नेत्याला वहात होता. त्याला काही शिवसेना कार्यकर्त्यांनी कृतीची जोड दिली. दादर परिसरात प्रत्येक गल्लीबोळात पिण्याचे पाणी व चहावाटप तर झालेच, पण देशभरातून आलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अनुयायांना वडापाव, पोहे असा अल्पोपहार देत, कार्यकर्ता म्हणून असलेल्या कर्तव्याचेही पालन केले. शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार कोणी बोलून दाखवीत होते, त्याच्या आठवणी एकमेकांना सांगत होते. आपण किती दसरा मेळाव्यांना हजेरी लावली आणि साहेबांच्या आदेशांचे पालन कसे केले, याची उजळणी करीत होते. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या उत्कर्षांचा, हक्कांच्या जागृतीचा आणि प्रगतीचा ध्यास घेतला. त्यासाठी आयुष्यभर झुंज दिली. ‘श्वासाची माळ तुटली, पण ध्यासाची कधीच नाही.’ याची आठवण ठेवत हजारो डोळ्यांनी शिवसेनाप्रमुखांची छबी डोळ्यात साठवत त्यांना अखेरचा निरोप दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray you given us fire and today tear to our eyes
First published on: 19-11-2012 at 02:24 IST