वांद्रेमधील गरीबनगर येथील अतिक्रमित झोपडय़ांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला या झोपडय़ांमधील सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे कारवाई थांबवण्याची वेळ आली. पालिकेच्या कारवाईनंतर अनेकांच्या झोपडय़ा जमीनदोस्त झाल्या. या पडलेल्या घरांच्या ढिगाऱ्यावर चढून गरीबनगर झोपडपट्टीवासी घरांचे अवशेष शोधत होते.

शुक्रवारी बेघर झालेले गरीबनगरवासीयांनी रस्त्यावर झोपडय़ा थाटल्या होत्या. जिथे जागा मिळेल तेथे स्थानिक आपले जमा केलेले सामान एकत्र करून संसार उभा करीत होते. घरातील कपाट, पेटय़ा, कपडय़ांची गाठोडी, खाट, सिलेंडर, ताटं-वाटय़ा अशा अनेक वस्तू रस्त्याच्या दुतर्फा अस्तावस्त ठेवण्यात आल्या होत्या. या सामानाजवळ बसलेले स्थानिक मदतीची वाट पाहत येणा-जाणाऱ्यांना आपल्या बेघरपणाची कहाणी सांगत होते. पालिकेने केलेल्या कारवाईत अनेकांच्या झोपडय़ा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्याकडे स्वयंपाक करण्यासाठी काहीच साधने नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्वासाठी जेवणाची सोय केली होती. काही कुटुंबीयांनी तर हॉटेलमधून जेवण आणणे पसंत केले. वांद्रे पूर्वेला जाणाऱ्या रेल्वे पुलाजवळील बस थांब्याजवळच या कुटुंबीयांनी झोपडय़ा थाटल्या आहेत. आग लागल्यानंतरही तळमजल्यावर झोपडी असणारे अनेक कुटुंबीय जळालेल्या घरात पुन्हा बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत होते. काही कुटुंबीयांनी लहान मुलांच्या जवळील नातेवाईकांकडे ठेवणे पसंत केले. या धावपळीत मुलांना काही त्रास होऊ नये यासाठी मुलांना नातेवाईकांकडे पाठवून कुटुंबीय मात्र आपल्या घराच्या प्रतीक्षेत रस्त्यावर बसून होते. ४ मार्च २०११ सालीही गरीबनगर झोपडपट्टीला आग लागल्यामुळे रहिवासी रस्त्यावर आले होते. मात्र काही दिवसांनी त्याच ठिकाणी पुन्हा नव्या झोपडय़ा बांधण्यात आल्या. यंदाही झोपडय़ा हटविल्या तरी आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. ३० ते ४० वर्षांपासून राहणाऱ्या अनेक कुटुंबीयांच्या झोपडय़ा गुरुवारी तोडण्यात आल्या. त्यामुळे यापूर्वी कारवाई का करण्यात आली नाही, गेल्या ४० वर्षांपर्यंत ही झोपडपट्टी का वाढू दिली, असा प्रश्न या भागातील इस्माल कुरेशी यांनी विचारला. केवळ निवडणुकांच्यावेळी नगरसेवक येतात व गरिबी हटावचे आश्वासने देतात. आम्हाला बेघर करणे हाच नरेंद्र मोदींचा विकास आहे का? असा प्रश्न गरीबनगर भागातील रहिवाशींनी केला आहे. नगरसेवकांनी आम्हाला नवीन घर देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आमच्या झोपडय़ा पाडल्या तरी आम्ही येथून हटणार नाही असे येथील महिलावर्ग सांगत होत्या.

गुरुवारी रात्री आग विझली असली तरी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांना झोपडय़ांमध्ये जाण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे अनेक कुटुंबीय झोपडय़ांच्या खाली उभे राहून अग्निशमन दलाच्या परवानगीची वाट पाहत होते. गुरुवारी वांद्रे पूर्वेच्या तिकीटघरापर्यंत आगीच्या झळा पोहोचू लागल्याने हा पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता.

वांद्रे पूर्वेकडील झोपडपट्टय़ांमुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. रेल्वेलगत प्लास्टिकच्या पिशव्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात झोपडय़ा जमीनदोस्त झाल्यानंतर ही सर्व कुटुंबीय रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहे. गुरुवारी रात्रीपासूनच कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचे पथक येथे तैनात आहे.