मुंबई : वांद्रे येथे रिक्षात घुसून १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी हा २२ वर्षाचा असून वांद्रे येथे फिरण्यासाठी आला होता.

वांद्रे येथे राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीने सोमवारी दुपारी महाविद्यालयात जाण्यासाठी एस.व्ही. रोड येथील बॉस्टन हॉटेलजवळून एक रिक्षा पकडली होती. येथील सायबा हॉटेलजवळील सिग्नलवर दुपारी १२ च्या सुमारास रिक्षा थांबली असताना काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक तरूण अचानक त्यात शिरला. रिक्षाचालक आणि त्या तरूणीने त्याला खाली उतरायला सांगितले. मात्र तो उतरायला तयार नव्हता. मला काही अंतरच पुढे जायचे आहे, दुसरी रिक्षा मिळत नाही असे सांगून जबरदस्तीने तो आत बसून राहिला. तरुणी आणि रिक्षाचालक त्याला उतरायला सांगत असतानाच सिग्नल सुरू होताच त्याने धारदार शस्त्र काढून रिक्षा थांबवायची नाही, अन्यथा मारून टाकेन अशी धमकी दिली. या प्रकारामुळे रिक्षाचालक आणि ती तरुणी दोघेही घाबरले. रिक्षा सुरू होताच त्याने तिचा विनयभंग केला. पुढील सिग्नलवर रिक्षा थांबल्यानंतर तो उतरून पळून गेला होता.

सीसीटीव्हीआधारे आरोपीला अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. सीसी टीव्हीच्या आधारे पोलिसांनी विक्रोळी येथून आतिक शेख (२२) या तरुणाला अटक केली. तो एका सराफाकडे काम करतो. सोमवारी तो वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो रिक्षा शोधत होता. दरम्यान त्याला पीडित मुलगी रिक्षात एकटी बसलेली दिसली. ती संधी साधून तो रिक्षात शिरला. हातातील कटरच्या सहाय्याने त्याने मुलीला आणि रिक्षाचालकाला धमकावले आणि तिचा विनयभंग केला, असे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले.

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ (विनयभंग), ७८ (अश्लील कृत्य करणे), ७९ (चोरून पाठलाग करणे), तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र त्याने संधी साधून हे विकृत कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.