नैसर्गिक हरितक्षेत्र कमी होत असताना सार्वजनिक उद्याने सुस्थितीत

मुंबई : एका बाजूला मुंबईतील मोकळ्या जागा, नैसर्गिक हरितक्षेत्र कमी होत असताना दुसऱ्या बाजूला सार्वजनिक उद्यानांमुळे मात्र मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. ७० टक्क्यांहून अधिक उद्याने उत्तम स्थितीत असून उद्यानांमधील प्रकाशयोजना उत्तम असल्याचे ८३ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. ‘प्रोजेक्ट मुंबई’ आणि ‘मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक’ या संस्थांनी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

उतारवयातील नागरिक आणि लहान मुलांसाठी विरंगुळा म्हणून तसेच तरुणांसाठी व्यायाम आणि भेटीगाठींचे ठिकाण म्हणून सार्वजनिक उद्याने महत्त्वाची भूमिका बजावतात. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणातून थोडीशी सुटका म्हणून काही वेळेसाठी मोकळ्या हवेचा अनुभव घेण्याकरिता शेकडो नागरिक रोज सकाळी सार्वजनिक उद्यानांमध्ये जातात. या वेळी त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. ‘हरित … द ग्रीन फूर्टंप्रट’ या फेलोशिप कार्यक्रमांतर्गत ८४ तरुण मुंबईकरांना प्रशिक्षित करून त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले.

मुंबईतील ५०० सार्वजनिक उद्यानांचे सर्वेक्षण करून त्यांच्या दर्जानुसार अ, ब आणि क श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले. सर्वेक्षण झालेल्या एकूण उद्यानांपैकी १८ टक्के उद्याने अ श्रेणीत म्हणजेच अपवादात्मक उत्तम स्थितीत आढळली. तसेच ७० टक्के उद्याने उत्तम स्थितीत असल्याने त्यांना ब श्रेणी देण्यात आली. १० टक्के उद्यानांमध्ये मात्र सुधारणा होण्याची गरज जाणवल्याने त्यांना क श्रेणी देण्यात आली. उद्यानांमधील प्रकाशयोजना उत्तम असून त्याची व्यवस्थित निगा राखली जात असल्याचे ८३ टक्के नागरिकांनी सांगितले. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने प्रथमच सार्वजनिक उद्यानांचा व तेथील सुविधांचा सविस्तर अहवाल आणि डिजिटल नकाशा तयार करण्यात आला.

नागरिकांचे म्हणणे…

  • सार्वजनिक उद्याने अपंगस्नेही असावीत असे ४० टक्के नागरिकांचे म्हणणे.
  • उद्यानातील पिण्याच्या पाण्याचा दर्जा सुधारावा व त्यासाठी पुरेशा पाणपोया उपलब्ध व्हाव्यात.
  • किमान ७० टक्के नागरिकांना १० ते १५ मिनिटे चालल्यानंतर उद्यानापर्यंत पोहोचता येते.