म्हाडाचा स्वतंत्र प्रकल्प; विकासकांकडून कंत्राटी पद्धतीने कामाचा पहिलाच प्रयोग
आतापर्यंत म्हाडाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या भूखंडावर परवडणारी घरे बांधली. या घरांच्या दर्जा नेहमीच चर्चेचा विषय बनला. मात्र पहिल्यांदाच ८७ एकर इतक्या मोठय़ा भूखंडावर रहिवाशांचे पुनर्वसन करून तब्बल १३ हजार गुणवत्तापूर्ण परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एल अँड टी आणि शापुरजी पालनजी यांसारख्या बडय़ा विकासकांकडून कंत्राटी पद्धतीने काम करून घेण्याचा म्हाडाचा हा पहिलाच स्वतंत्र प्रकल्प आहे.
मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकासात नायगावसाठी एल अॅण्ड टी तर ना. म. जोशी मार्ग येथे शापुरजी पालनजी यांच्या निविदा सरस ठरल्या आहेत. त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून येत्या सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. वरळी येथील प्रकल्पासाठी निविदा जारी करण्यात आल्या असून त्यातही लवकरच कंत्राटदार नियुक्त केला जाणार आहे, असे म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे यांनी सांगितले.
बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाचे घोडे गेले दशकभर अडले होते. परंतु मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची घोषणा करून ती जबाबदारी म्हाडावरच सोपविली. त्यासाठी सुधारित विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) निर्माण करण्यात आली.
तिन्ही चाळींतील सुमारे १६ हजार २०३ रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. याशिवाय १३ हजार ६१३ घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामध्ये अल्प, मध्यम तसेच उच्च उत्पन्न गटाचा समावेश आहे. याशिवाय विक्रीयोग्य एकूण बांधकामाच्या १० टक्के व्यावसायिक गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च या विक्रीतून मिळणार असल्याचा दावाही झेंडे यांनी केला.
असा मार्गी लागला प्रकल्प..
- मे २०१५ – मुख्यमंत्र्यापुढे सादरीकरण व प्रकल्प अहवाल
- जानेवारी २०१६ – सल्लागार वास्तुशास्त्रज्ञांची नियुक्ती आणि त्यांनी केलेल्या प्रतिकृतींचे सादरीकरण
- मार्च २०१६ – मंत्रिमंडळाची मंजुरी; म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
- सप्टेंबर २०१६ – अल्प, मध्यम व उच्च गटात परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय; आराखडय़ास तत्त्वत: मंजुरी
- ऑक्टोबर २०१६ – पर्यावरण विभागाकडून तत्त्वत: मंजुरी; भूखंड म्हाडाच्या नावे
- डिसेंबर २०१६ – विकास नियंत्रण नियमावली ३३ (९)(ब) जारी; नायगाव व ना. म. जोशी मार्ग प्रकल्पासाठी जागतिक निविदा जारी
- मार्च २०१७ – एल अॅण्ड टी व शापुरजी पालनजी यांची ठेकेदार म्हणून नियुक्ती; वरळी पुनर्विकासासाठी प्रक्रिया सुरू
हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा यासाठी गेली दोन वर्षे आम्ही प्रयत्नशील होतो. सल्लागार वास्तुरचनाकार ते सुधारित स्वतंत्र नियमावलीपर्यंतचा प्रवास पूर्ण करून जागतिक निविदा जारी केल्या. त्यास एल अॅण्ड टी व शापुरजी पालनजी यांसारखे नामवंत विकासक ठेकेदार लाभल्यामुळे आता गुणवत्तापूर्ण परवडणारी घरे निर्माण होतील.
– संभाजी झेंडे, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा