BDD Chawl Redevelopment : ‘तीन वर्षांत पुनर्वसन इमारतीचे काम’

 आता लवकरच ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबई : ऐतिहासिक वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात झाली असून वरळी जांबोरी मैदान येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. आजपासून पुढील ३६ महिन्यांत पुनर्वसन इमारतीचे काम पूर्ण करत रहिवाशांना घराच्या चाव्या देऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे १०० वर्षे जुन्या या चाळींचा पुनर्विकास राज्य सरकारने म्हाडाकडे सोपवला. पण चार वर्षे झाली तरी प्रकल्पाच्या कामाला मात्र सुरुवात झाली नव्हती. सर्व अडचणी सोडवत अखेर सरकारने आणि म्हाडाने आता वरळीच्या कामाला सुरुवात केली आहे.

आता लवकरच ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. तिन्ही ठिकाणच्या १९५ चाळींचा पुनर्विकास करत १५ हजार ५९३ रहिवाशांना ५०० चौ फुटांचे घर देण्यात येणार आहे. या परिसरातील पात्र झोपडपट्टीवासीयांना २६९ चौ फुटांची घरे देण्यात येणार आहेत. या चाळींमध्ये २०१० पर्यंत राहणाऱ्या २९३७ पोलीस कर्मचाऱ्यांनाही घरे देण्यात येणार असल्याचे यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

कामाठीपुरा आणि कुलाबा झोपडपट्टीचा लवकरच पुनर्विकास

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानंतर आता कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाईल. तर कुलाब्यातील झोपडपट्टीचा पुनर्विकास म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जाईल, अशी घोषणा यावेळी आव्हाड यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bdd chawl redevelopment work will complete in 3 months zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या