डाळींच्या किमती भरमसाट वाढल्याने उपाहारगृह चालकांनाही डाळीचे पदार्थ परवडेनासे झाले आहेत. परिणामी ‘दाल तडका’, ‘दाल खिचडी’, ‘दाल फ्राय’ या खाद्यपदार्थाना पर्याय म्हणून अन्य पदार्थ देण्यास काही हॉटेल व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे . कांदा महागला तेव्हा उपाहारगृहांमध्ये त्याची जागा कोबीने घेतली होती. अर्थात कांद्याऐवजी कोबी खाण्याला तेव्हाही ग्राहकांची ‘ना’च होती. आता तूरडाळीबरोबरच मूग, मसूर या डाळींच्या किमतीही गगनाला भिडू लागल्या आहेत. परिणामी तूरडाळीला इतर डाळींचा पर्याय द्यायचा तरी अडचण. त्यामुळे, काही उपाहारगृहांनी डाळीच्या खाद्यपदार्थाची नावेच आपल्या ‘मेन्यू कार्ड’वरून काही दिवस हद्दपार करायचे ठरविले आहे. ‘डाळींच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. आम्ही ‘दाल तडका’, ‘दाल खिचडी’, ‘दाल फ्राय’, सांबार अशा किती तरी पदार्थामध्ये डाळींचा वापर करतो. थाळीमध्येही डाळीचे वरण किंवा आमटीचा समावेश असतो. परंतु डाळींच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की हे पदार्थच आम्हाला तात्पुरते का होईना बंद करावे लागतील. थाळीतही डाळीच्या वरणाला टोमॅटोचे सार किंवा कढी असे पर्याय आम्हाला अजमवावे लागतील,’ असे दादरच्या ‘मनोहर’ या हॉटेलचे चालक कृष्णा बंगेरा यांनी सांगितले. ‘डाळीच काय पण कुठलीही कडधान्ये किंवा भाज्यांच्या किंमती वाढल्या तरी आमच्याकडे पर्याय नसतो. डाळी किंवा इतर अन्नधान्यांच्या किमती कायम वरखाली होतच असतात. त्यामुळे आम्हाला आमच्या खाद्यपदार्थाच्या किमतीत इतके चढउतार करता येणे शक्य नसते, कारण त्याचा ग्राहकांवर बरावाईट परिणाम होऊ शकतो. परिणामी किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तर जो काही नफातोटा असेल तो सहन करावा लागतो,’ असे ‘आस्वाद’च्या चालकांनी सांगितले.
चवीशी तडजोड नाही
अर्थात काही हॉटेल मालक धान्यांच्या किमती वाढल्या तरी चवीत तडजोड करण्यास तयार नाहीत. ‘कांदा महागला होता तेव्हा आम्ही ग्राहकांना कोबी देत असू. परंतु अनेक ग्राहकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. तुम्ही पैसे जास्त घ्या परंतु आम्हाला कांदाच द्या, असे अनेक ग्राहकांचे म्हणणे असते. त्यामुळे आम्ही डाळी किंवा भाज्यांच्या किमती वाढल्या तरी चवीशी तडजोड करीत नाही. शेवटी ग्राहक आमच्याकडे आमच्या नावावर विसंबून येत असतो,’ असे ‘प्लाझा’समोरील ‘तृप्ती’ हॉटेलचे चालक राजेंद्र भागवत यांचे म्हणणे होते.