६६ हून अधिक कर्मचाऱ्यांना बाधा
मुंबई: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा बेस्ट उपक्रमातही शिरकाव झाला असून ६६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये बहुतांश चालक, वाहक आहेत. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत बेस्टचे अनेक कर्मचारी करोनाबाधित झाले होते. कर्मचाऱ्यांची चाचणी, त्यांच्यावर झटपट उपचाराचे नियोजन केल्यानंतर दुसऱ्या लाटेत ही संख्या कमी झाली. करोनाबाधितांची व उपचाराधीन रुग्णांची संख्या २४ डिसेंबरपर्यंत शून्य झाली होती.
दुसऱ्या लाटेनंतर करोना रुग्णांची संख्या कमी होताच निर्बंध शिथिल झाले. त्यातच प्रवासावरील निर्बंधही शिथिल झाल्याने प्रवाशांची संख्या वाढू लागली. ही संख्या २७ लाखांपर्यंत पोहोचली. सकाळी व सायंकाळी बेस्ट बसगाड्यांना प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यातच चालक, वाहकही अनेकांच्या संपर्कात येऊ लागले.
उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरपासून ते आतापर्यंत ६६ बेस्ट कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये ६० टक्के रुग्ण बेस्टने आगारातून केलेल्या तपासणीमुळे आढळून आले आहेत. आतापर्यंत ४० कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारानंतर नऊ जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असल्याची माहिती देण्यात आली. करोनाबाधित आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहक आणि आगारातील कर्मचारी अधिक आहे.
प्रमाणपत्र तपासणी नाहीच
करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबईतील बेस्ट प्रवासी संख्याही वाढू लागली आहे. सध्या रोजची प्रवासी संख्या २७ लाखांपार गेली. वाढत असलेली प्रवासी संख्या, त्यातच करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतरही बेस्ट उपक्रमाने दोन लसमात्रा
प्रमाणपत्र तपासणीची अंमलबजावणी एक महिना उलटूनही केलेली नाही. प्रवाशांना फक्त दोन लस घेण्याचे आवाहन करण्यावरच बेस्ट प्रशासनाने समाधान मानले आहे.