करार मान्य असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन; ९ ऑक्टोबरपासून संपावर संघटना ठाम

सातव्या वेतन आयोगातील तरतुदींइतकी वाढ नसल्याचे कारण देत ‘बेस्ट’मधील कर्मचारी संघटनांनी फेटाळलेला वेतन करार लागू करण्यावर ‘बेस्ट’ प्रशासन ठाम आहे. सामंजस्य करार मान्य असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबर रोजी वाढीव वेतन मिळेल, असे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. मात्र, बेस्ट वर्कर्स युनियनने ९ ऑक्टोबरपासून संपावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.

बेस्ट उपक्रमाने आखलेला सामंजस्य करारातील वेतन करार हा सातवा वेतन आयोगाएवढा नाही. तसेच या करारात आर्थिक कारणांमुळे वेतन न मिळणे, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचाही प्रश्न उद्भवणाऱ्या अटींसह इत्यादी नमूद केल्याने बेस्ट वर्कर्स युनियनसह अन्य संघटनांची मिळून बनलेल्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने त्याला विरोध केला आहे, तर ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाकही दिली आहे. बेस्ट उपक्रमाचा सामंजस्य करार हा बेस्टमधील ३३ हजार कर्मचाऱ्यांपैकी शिवसेना व भाजप्रणीत संघटनांसह अन्य काही कर्मचाऱ्यांनी मान्य केला असून त्यांची संख्या १२ हजारांपर्यंत आहे. त्यामुळे करार मान्य असलेल्यांनाच वाढीव वेतन लागू केले जाणार असल्याचे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी वारंवार स्पष्ट केल्यानेच कामगार संघटनांनाही धक्का बसला आहे.

बेस्ट समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत बागडे यांनी पुन्हा तेच स्पष्टीकरण दिले. कर्मचाऱ्यांना वेतन कधी देणार व किती कर्मचाऱ्यांना ते मिळणार, सानुग्रह अनुदानाचे काय, असे बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी विचारले असता, १५ ऑक्टोबरपासून वाढीव वेतन कर्मचाऱ्यांना मिळेल. त्याआधी १ ऑक्टोबर रोजी नेमके किती वेतन मिळेल याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. ज्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या, त्यांनाच वाढीव वेतनाचा लाभ मिळेल, असे बागडे यांनी सांगितले. बेस्ट उपक्रमाच्या या भूमिकेमुळे कामगार संघटना व उपक्रमातील संघर्ष आणखी शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.

बोनसही दिवाळीआधी मिळणार

विधानसभा निवडणूक मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी आहे. ते संपल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळेल, अशी माहितीही बागडे यांनी दिली.

बेस्टचा सामंजस्य करार मान्य नाही. यात आर्थिक कारणांमुळे कर्मचाऱ्यांचा पगार, नोकरीचा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चिंता लागून आहे. याचा विचार सह्य़ा केलेल्या कर्मचाऱ्यांनी का केला नाही? बेस्ट उपक्रमाच्या या भूमिकेविरोधात ९ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. – शशांक राव, अध्यक्ष, बेस्ट वर्कर्स युनियन