इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यानंतरही या मार्गावरून अद्याप ‘बेस्ट’ची सेवा सुरू झालेली नाही. बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असतानाही बेस्टने अद्याप नियोजन केलेले नसल्याने सर्वसामान्यांचा या मार्गावरील प्रवास महागडाच ठरत आहे.

हेही वाचा >>> दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेत वाद; विभागप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरिन ड्राइव्ह दक्षिणवाहिनी मार्गिका १२ मार्चपासून खुली झाली. मार्गाचे काम सुरू होण्याच्या आधीपासून बस व रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते. मार्गावर अवजड वाहने, दुचाकी, तीन चाकी आणि पादचाऱ्यांना प्रवेश नसल्याने या मार्गावरून जायचे असल्यास केवळ स्वत:चे चारचाकी वाहन किंवा टॅक्सीचाच पर्याय आहे. बेस्टमुळे सर्वसामान्यांनाही तेथून प्रवास करणे शक्य झाले असते. मात्र सध्या या मार्गाचा थोडासाच भाग सुरू झाला असून संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर ‘बेस्ट’ बसमार्ग ठरवले जातील, असे बेस्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अपुऱ्या बसमुळे निर्णय लांबणीवर?

‘बेस्ट’कडे गाडयांचा अपुरा ताफा असल्यामुळे सागरी किनारा मार्गावरून सेवा सुरू होत नसल्याची चर्चा आहे. नवीन गाडयांसाठी कार्यादेश दिलेले असले तरी त्या गाडया येण्यास वेळ लागणार आहे.