दरवर्षी वाढत चाललेल्या तोटय़ामुळे बेस्ट उपक्रमाची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय आणि प्रवास भत्ता गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कर्मचारी संघटनांनी विरोधाचा सूर लावल्यामुळे बेस्ट उपक्रमाचे प्रशासन अडचणीत आले आहे.

गेली काही वर्षे बेस्टचा परिवहन विभाग सातत्याने तोटय़ात जात आहे. बेस्टचा तोटा हळूहळू वाढत असून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी बेस्टला कर्ज घ्यावे लागत आहे. आर्थिक तोटय़ातून बाहेर पडण्यासाठी बेस्टला पालिकेने एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली होती. राजकीय पक्षांचीही अशीच मागणी होती. मात्र स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बेस्ट उपक्रम कोणत्या उपाययोजना करणार आहे, अशी विचारणा करीत पालिका प्रशासनाने काही उपाययोजना बेस्टला सुचविल्या होत्या. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने काटकसरीचा मंत्र जपण्यास सुरुवात केली आहे. आता बेस्ट उपक्रमाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा ५०० रुपये वैद्यकीय भत्ता गोठविण्याचा निर्णय घेतला आहे.

दर महिन्याला मोठी बचत

वैद्यकीय भत्ता गोठविल्यास २ कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत होऊ शकेल, असा अंदाज बेस्ट प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ब श्रेणीमधील अधिकाऱ्यांना दिला जाणारा ५०० रुपये प्रवासभत्ताही गोठविण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यामुळे दर महिन्याला ५० ते ६० लाख रुपयांची बचत होऊ शकेल, असे बेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.