मुंबई : बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा ताफा आता १७ टक्क्यांपेक्षा कमी झाला असून. येत्या काळात बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच बेस्टचे प्रवासीही घटत चालले आहेत. परंतु नुकत्याच केलेल्या भाडेवाढीमुळे बेस्टचे उत्पन्न १७ कोटींनी वाढले आहे.
बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा आता १७ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. नियमानुसार पंधरा वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या बस भंगारात काढल्या जात आहेत. त्यामुळे बेस्टमधील स्वमालकीचा बस ताफा झपाट्याने कमी होत आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीच्या १,५०० बस होत्या. तर, हा आकडा एप्रिल २०२४ पर्यंत १,१०० पर्यंत झाला. तर, आता मे २०२५ मध्ये ४३७ स्वमालकीच्या बस शिल्लक राहिल्या आहेत. सध्या बेस्टमध्ये एकूण २,५९४ पर्यंत बस असून त्यातील सुमारे २,१५७ बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. सुमारे १७ टक्के स्वमालकीच्या आणि ८३ टक्के भाडेतत्त्ववरील बस आहेत.
प्रवासी घटले…
बेस्टची आर्थिक गणिते सुधारण्यासाठी, भाडेवाढ करण्यात आली. बेस्ट उपक्रमाने दैनंदिन आणि मासिक बसपासच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन बसपासचे शुल्क ६० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आले आहे. मासिक शुल्क ९०० रुपयांवरून एक हजार ८०० रुपये केले. विनावातानुकूलित बसचे किमान भाडे ५ रुपये आणि वातानुकूलित बसचे किमान भाडे ६ रुपये होते. हे भाडे दुप्पटीने वाढल्याने, जवळचे ठिकाण गाठून, बेस्ट बसचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. मे २०२५ दरम्यानच्या कालावधीत बेस्ट प्रवाशांची संख्या ५ कोटी ९५ लाख होती. त्यामुळे दैनंदिन सरासरी २०.५५ लाख प्रवाशांचा प्रवास झाला. बेस्ट बसद्वारे दैनंदिन ३० ते ३२ लाख प्रवाशांचा प्रवास होत होता. परंतु, भाडेवाढ केल्याने, प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा स्वीकार केला आहे. त्यातच बसची संख्या कमी असल्यामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांना बसची वाट पाहात ताटकळावे लागते आहे.
भाडेवाढीने उत्पन्न वधारले…
मे २०२४ मध्ये एकूण ८ कोटी ०८ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. तर, मे महिन्यात हा आकडा घसरून, ५ कोटी ९५ लाखांवर आला आहे. मे २०२४ मध्ये दैनंदिन सरासरी प्रवासी २६ लाख होते. तर, मे २०२५ मध्ये हा आकडा २०.५५ लाखांपर्यंत घसरला आहे. बेस्टला मे २०२४ मध्ये ५६.१० कोटी रुपये उत्पन्न बेस्ट उपक्रमाला मिळाले होते. तर, मे २०२५ मध्ये ७३.२६ कोटी रुपये उत्पन्न बेस्ट उपक्रमाला मिळाले आहे. त्यामुळे १७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच ५ मे २०२५ ते २ जून २०२५ पर्यंत बेस्टला प्रवासी सेवेतून ७१.५८ रुपयांचा महसूल बेस्ट उपक्रमाला मिळाला आहे.