‘बेस्ट’च्या उत्पन्नात प्रतिदिनी तीन कोटींची घट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली अनेक वर्षे भारनियमनाचा चटका न देता शहरात नित्यनियमाने अखंड विद्युतपुरवठा करणारा बेस्टचा विद्युतपुरवठा विभागही परिवहन विभागाच्या पावलावर पाऊल टाकत तोटय़ाच्या दिशेने निघाला आहे. ऑक्टोबर आणि एप्रिलमध्ये विजेचे दर कमी केल्यामुळे आणि मोठय़ा ग्राहकांनी साथ सोडण्यास सुरुवात केल्याने ऑक्टोबरपासून विद्युतपुरवठा विभागाला प्रतिदिनी तीन कोटी रुपयांचा चटका सहन करावा लागत आहे. तसेच, भविष्यात तो वाढत जाण्याची भीती बेस्ट अधिकाऱ्यांकडून व्यक्त होते आहे. दुसरीकडे परिवहन विभागाचा प्रतिदिन तोटा एक कोटींवर गेला आहे. त्यामुळे, अवघा बेस्ट उपक्रमच डबघाईला येण्याची चिन्हे आहेत.

केवळ मुंबईच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर आसपासच्या शहरांमध्ये प्रवाशांना सुखरूपपणे पोहोचवण्याचे काम बेस्टचा परिवहन विभाग गेली अनेक वर्षे करीत आहे. सातत्याने तोटय़ात चालणाऱ्या परिवहन विभागाला सावरण्यासाठी विद्युतपुरवठा विभागाच्या नफ्याचा आधार घेतला जात होता. त्यासाठी संपूर्ण मुंबईत आणि लगतच्या शहरांमधील प्रवाशांना बससेवा उपलब्ध करणाऱ्या परिवहन विभागासाठी शहरात सीमित असलेल्या वीजग्राहकांवर अधिभाराचा भार टाकण्यात आला होता. या अधिभारापोटी बेस्टच्या तिजोरीत दर महिन्याला सुमारे ६० कोटी रुपये जमा होत होते. या ६० कोटी रुपयांची शिदोरी परिवहन विभागासाठी वापरण्यात येत होती. मात्र वीजग्राहकांवर लादलेला हा अधिभार घेणे बेस्टला बंद करावे लागले आहे. त्यामुळे परिवहन विभागाला मिळणारी ६० कोटी रुपयांची आर्थिक रसद बंद झाली आहे.

परिवहन विभागाला प्रतिदिन एक कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यात आता विद्युतपुरवठा विभागाच्या प्रतिदिन तीन कोटी रुपयांच्या तोटय़ाची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही विभागांचा मिळून प्रतिदिन चार कोटी म्हणजे महिन्याकाठी १२० कोटी रुपये आणि वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येणारा अधिभार बंद केल्यामुळे ६० कोटी असे एकूण १८० कोटी रुपये तोटा बेस्ट उपक्रमाला सोसावा लागत आहे. बेस्टच्या परिवहन विभागाला २०१६-१७ मध्ये १७०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. सवलती जाहीर केल्यामुळे या वर्षांत १६०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही.

मोठय़ा ग्राहकांची सोडचिठ्ठी

गेल्या ऑक्टोबरमध्ये बेस्टने प्रतियुनिट विजेचे दर कमी केले होते. तेव्हापासून विद्युतपुरवठा विभागाच्या उत्पन्नात तीन कोटी रुपयांनी तूट येऊ लागली होती. आता एप्रिलमध्ये पुन्हा एकदा बेस्टने प्रतियुनिट विजेचे दर कमी केले. तसेच मोठे ग्राहक बेस्टला सोडचिठ्ठी देऊ लागले आहेत. त्यामुळे विद्युतपुरवठा विभागाच्या उत्पन्नात भविष्यात मोठी घसरण होण्याची भीती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best power department running in loss
First published on: 22-04-2017 at 02:08 IST