बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून बेस्टचे जवळपास ३५ हजार कर्मचारी संपावर जाणार होते. मात्र औद्योगिक न्यायालयाने बेस्ट कृती समितीला संप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे मध्यरात्रीपासून सुरु होणारा संप मागे घेण्यात आला आहे. मुंबईकरांचा जीव यामुळे भांड्यात पडला आहे.
लोकल पाठोपाठ मुंबईत प्रवास करण्यासाठी सर्वाधिक वापरण्यात येणारी सेवा म्हणजे बेस्ट. या बेस्टचे ३५ हजार कामगार मध्यरात्रीपासून संपावर जाणार होते. मात्र तूर्तास हा संप टळला आहे. बेस्टच्या ताफ्यात ४५० खासगी बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावावरून वाद पेटला होता. मात्र हे संपूर्ण प्रकरण औद्योगिक न्यायालयात आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत बंद किंवा संप किंवा कोणतेही आंदोलन करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचमुळे बेस्टचा पूर्वनिजोयित संप मागे घेण्यात आला आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बेस्ट कृती समितीने आपल्या नियोजित संपाला स्थगिती दिली आहे. संप झाला असता तर गुरुवारी सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले असते. मात्र आता तसे होणार नाही. कारण या संपाला स्थगिती देण्यात आली आहे.
बेस्टला खासगीकरणाकडे नेले जाते आहे असा आरोप करत शशांक राव यांच्या बेस्ट युनियन समितीने विरोध दर्शवला आहे. तसेच हळूहळू बेस्ट संपविण्याचा घाट घातला जातो असाही आरोप या संघटनेने केला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिलेल्या दिवाळी बोनसचे हप्ते त्यांच्याचकडून वसूल करत प्रशासनाने बेस्ट कामगारांवरच अन्याय केला आहे असेही या संघटनेचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून संप पुकारण्यात आला होता. मात्र तूर्तास ५ मार्च पर्यंत बेस्ट कामगार कृती समितीला संप करता येणार नाही असे औद्योगिक न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे संप मागे घेण्यात आला आहे.