सोमवारपासून नवी योजना; विविध घटकांसाठी सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेस्ट बसकडे पाठ फिरविणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि काडीमोड घेऊ लागलेले वीजग्राहक यांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने १ मेपासून ‘बेस्ट आमची, काळजी घेते सर्वाची’ ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार वर्षभरातून एकदा बेस्टचे प्रवासी आणि वीज ग्राहक यांची सवलतीच्या दरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

गेली काही वर्षे बेस्टचा परिवहन विभाग सातत्याने तोटय़ात जात आहे. वीज दर कमी केल्यामुळे आणि मोठय़ा ग्राहकांनी अलविदा करण्यास सुरुवात केल्याने विद्युतपुरवठा विभागाचीही तोटय़ाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. याची गंभीर दखल घेत बेस्टने प्रवाशी आणि वीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘बेस्ट आमची, काळजी घेते सर्वाची’ ही योजना आखली आहे. बेस्ट बसचा मासिक पास असलेल्या प्रवाशांची रक्तदाब, रक्तातील साखरेची, तर ई-पर्स/त्रमासिक पास आणि वीज ग्राहकांसाठी हिमोग्लोबीन, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. वर्षांतून एकदा मोफत नेत्रतपासणी आणि वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणी योजनेत ५० टक्के सवलत, काही अटींसापेक्ष बसपासधारक, ई-पर्स, वीजग्राहकांना रुग्णालयाच्या बिलात (रुग्णालयात दाखव, शल्यक्रिया वगळून) २० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर बेस्टचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, माजी कर्मचारी-त्यांचे जोडीदार, बेस्ट समिती सदस्य-त्यांचे जोडीदार, बेस्टबाबतचे वृत्तसंकलन करणारे बसपासधारक पत्रकार यांच्यासाठीही काही वैद्यकीय सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या १ मेपासून ही योजना अमलात येणार आहे, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, या योजनेमुळे बेस्टवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best transport service new plan
First published on: 29-04-2017 at 01:05 IST