मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीतील (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) ‘मुंबई १’ कार्डद्वारे आता बेस्ट बसमधून प्रवास करता येणार आहे. आता या कार्डद्वारे मेट्रोबरोबरच बेस्ट बसचे तिकीटही काढता येणार आहे. त्यामुळे मेट्रो आणि बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पंतप्रधान लिखित पुस्तक विद्यार्थ्यांना वाटा! प्रशासनाच्या शाळांना सूचना

मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टसाठी एकच तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली होती. गेली अनेक वर्षे या संदर्भात काम सुरू होते आणि अखेर ही जबाबदारी एमएमआरडीएने पूर्ण केली. एमएमआरडीएने ‘मुंबई १’ नावाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड तयार केले आहे. या कार्डचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यानंतर २० जानेवारीपासून ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेतील सर्व मेट्रो स्थानकांवर हे कार्ड उपलब्ध करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी, २० जानेवारी रोजी एक हजार ७८७ कार्डची विक्री झाली.

हेही वाचा >>>मुंबई: थकीत सेवाशुल्क वसुलीच्या म्हाडाच्या नोटीसांना अखेर सरकारची स्थगिती; हजारो रहिवाशांना दिलासा

तूर्तास या कार्डाचा वापर केवळ ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’साठीच करता येणार आहे. ‘मेट्रो १’ (घाटकोपर-वर्सोवा), रेल्वे आणि बेस्टशी ही सुविधा जोडण्यासाठी चाचणी सुरू असून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणखी काही महिने लागतील, असे सांगण्यात येत होते. मात्र आता या कार्डवरूनच बेस्ट बसचे तिकीटही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ‘मुंबई १’ कार्डधारकांना मेट्रोसह बेस्ट बसच्या तिकिटाची सुविधाही उपलब्ध झाल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. आता लवकरच ‘मेट्रो १’, मोनो आणि रेल्वेशी हे कार्ड जोडण्यात येणार असून त्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, भविष्यात या कार्डचा वापर करून देशभरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे तिकीटही काढता येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best travel with metro also through mmrdas mumbai1 card mumbai print news amy
First published on: 25-01-2023 at 12:09 IST