मुंबई : शाळांच्या सहभागाने कचऱ्यापासून खतनिर्मिती करून उद्याने फुलविण्यात त्याचा वापर करण्याची अभिनव प्रथा भामला फाऊंडेशनने सुरू केली आहे. गेल्या वर्षी पाच शाळांच्या सहकार्याने भामला फाऊंडेशनने हा उपक्रम राबविला होता. नजिकच्या काळात आणखी काही शाळांच्या सहभागाने या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे. त्यामुळे कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या शाळांची संख्या २०वर पोहोचावी, असा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांमध्ये प्लास्टिकच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू कचऱ्यामध्ये फेकून दिलेल्या आढळतात. हा प्लास्टिकचा कचरा नद्या आणि समुद्रामध्ये जमा होते. पाण्यामध्ये प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे जल प्रदूषणाचा धोका वाढत आहे. त्याचबरोबर जैवविविधतेलाही  धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळण्याची नितांत आवश्यकता आहे. किंबहुना पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याची गरज आहे, असे भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यांनी सांगितले.

त्याचाच एक भाग म्हणून फाऊंडेशनने एका गाण्याची निर्मिती केली असून त्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळा आणि एकवेळ वापराच्या दर्जाचे प्लास्टिक हद्दपार करा, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे. प्रसिद्ध संगीतकार शान यांनी या गाण्याला संगीत दिले असून गीतरचना स्वानंद किरकिरे यांनी केली आहे. गाण्याची नृत्यरचना शामक दावर यांनी केली आहे. शंकर महादेवन, सोनू निगम, अरमान मलिक, सुनिधी चौहान, आयुषमान खुराना, कर्णिका कपूर, निती मोहन, शेखर रावजियानी  आदी मान्यवरांनी प्लास्टिक बंदी मोहिमेला पाठिंबा दर्शवत या गाण्यांमध्ये सहभाग घेतला आहे, असे आसिफ भामला यांनी सांगितले.

प्लास्टिक बंदीसाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. सरकारने एक पाऊल टाकल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आपणही एक पाऊल टाकणे गरजेचे आहे. गाणे हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने प्लास्टिकविरोधी जनजागृतीसाठी या गाण्याची निर्मिती केली आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही या गाण्याची झलक युटय़ूबवर दिली होती. युटय़ूबपासून सर्व समाजमाध्यमांमध्ये गाण्याला चांगली लोकप्रियता मिळत आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी याचे अधिकृतरित्या अनावरण करण्यात येणार आहे, असेही भामला यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhamla foundation to tie up with schools to convert waste to manure
First published on: 02-06-2018 at 03:53 IST