भारडा हायस्कूलचा ‘वाचन प्रेरणा दिन’
ग्रांट रोड येथील जे. डी. भारडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग चोवीस तास वाचन करून ‘वाचन प्रेरणादिनी’ एक आगळावेगळा विक्रम केला आहे
१५ ऑक्टोबर हा दिवस माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन असून या दिवशी वाचन प्रेरणा दिन राज्यभर साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने भारडा शाळेतील विद्यार्थ्यांनी चोवीस तास वाचन उपक्रमाचे आयोजन केले होते. गुरुवारी सकाळी १०.०६ मिनिटांनी विद्यार्थ्यांनी वाचन सुरू केले. त्यानंतर सलग २४ तास अखंड वाचन करून ते दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०६ मिनिटाला थांबविण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोश केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये होणार आहे.
शाळेतील १० ते १४ वर्षे वयोगटांतील ५० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाली होती. त्यांनी डॉ. कलामांच्या विविध पुस्तकातील उताऱ्यांचे वाचन या वेळी केले. या शाळेचे कौतुक करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण उपस्थित होते. तसेच, समारोपाला शिक्षक परिषदेचे मुंबई अध्यक्ष अनिल बोरनारे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संचालक शिवाजी गलांडे हेही उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका गीता उन्निथन व शाळेतील २२ शिक्षकांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.