८०० कुटुंबे, ६५० दुकानदारांचा जागा सोडण्यास नकार; दीडशे इमारतींचे पाडकाम रखडले

दाट लोकवस्ती आणि अनेक बाजारपेठांचे केंद्र असलेल्या भेंडीबाजारचा पुनर्विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या योजनेची गती रहिवासी आणि दुकानमालकांच्या विविध प्रश्नांमुळे मंदावली आहे. या भागातील तब्बल अडीचशे इमारतींचा ‘सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट’मार्फत विकास करण्यात येणार आहे. मात्र, विविध कारणांमुळे ८०० कुटुंबे आणि ६५० गाळेधारकांनी आपली जागा सोडण्यास नकार दिल्याने सुमारे दीडशे इमारतींचे पाडकाम रखडले आहे.

दक्षिण मुंबईमधील भेंडीबाजार परिसर बाजारपेठांचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात दिवसभर प्रचंड वर्दळ असते. वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची गर्दी यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. या परिसरात दाटीवाटीने असंख्य इमारती उभ्या असून त्यापैकी बहुतांश इमारती १००हून अधिक वर्षे जुन्या आहेत. एकमेकांना खेटून असल्याने या इमारतींची दुरुस्ती करता येत नाही. परिणामी या भागातील अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे सुमारे १६.५ एकर भूखंडावर पसरलेल्या भेंडीबाजारचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने घेतला. या ठिकाणच्या अडीचशे जुन्या इमारती पाडून ३५ ते ५० मजल्यांच्या १७ इमारती उभ्या करण्याची योजना आहे.

या २५० इमारतींमध्ये तब्बल ३२०० रहिवाशी आणि १२५० दुकाने आहेत. या इमारतींमधील रहिवाशांसाठी माझगाव येथील अंजिरवाडी, घोडपदेव आणि शीव येथील सोनावटी येथे संक्रमण शिबिरे उभारण्यात आली असून येथील घर अथवा १५ हजार रुपये मासिक भाडे असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत २४०० कुटुंबांनी आपले मूळ घर रिकामे केले आहे. तसेच १२५० पैकी ६०० दुकानदारांनीही गाळे सोडले आहेत. त्यानंतर पूर्णपणे रिकाम्या झालेल्या १०० इमारती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी चार बहुमजली इमारतींचे बांधकामही करण्यात आले. मात्र, उरलेल्या दीडशे इमारतींतील अनेक कुटुंबांनी राहती जागा सोडण्यास नकार दिला आहे.

यापैकी बहुसंख्य इमारती पागडी पद्धतीच्या असून घरमालकांकडून घरे रिकामी करण्यात चालढकल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, ट्रस्टने पर्यायी घरांसाठी देऊ केलेले १५ हजार रुपये मासिक भाडे कमी असून जास्त रक्कम मिळावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. आजारपण, मुलांची शाळा, घराच्या क्षेत्रफळाबाबतच्या मोजणीवरून निर्माण झालेले मतभेद या कारणांमुळेही काही कुटुंबे घरे रिकामी करण्याच्या विरोधात आहेत. एकूण १५० इमारतींमधील ८०० रहिवाशी जुन्या इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत. पावसाळा जवळ येत असल्यामुळे रहिवाशांनी लवकरात लवकर घर रिकामे करावे यासाठी ट्रस्टकडून प्रयत्न सुरू आहेत. उच्चशिक्षित मंडळींचे एक पथक ट्रस्टच्या वतीने रहिवाशांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

रहिवाशांची मागणी लक्षात घेता पर्यायी घरभाडय़ापोटी १५ हजार ते २० हजारांऐवजी ३० हजार रुपये देण्याची तयारी ट्रस्टने दोन-तीन महिन्यांपूर्वीच दर्शविली आहे.

मात्र रहिवाशी पुढे येत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या १५० इमारती पाडून झाल्यानंतर त्या जागी नव्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मात्र ट्रस्टने चर्चेसाठी दालने खुली ठेवल्यानंतरही इमारत मालक आणि रहिवाशांकडून नकारघंटा वाजविली जात असल्यामुळे देशात आदर्श ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाची गती मंदावली आहे.

भेंडीबाजारातील २५० इमारतींमधील बहुसंख्य रहिवाशांनी ट्रस्टवर विश्वास ठेवून पुनर्विकासाला सहमती दर्शविली आहे. उर्वरित ८०० रहिवाशी आणि ६५० रहिवाशांशी चर्चा सुरू आहे. लवकरच या मंडळींचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील आणि पुनर्विकासाला गती मिळेल.

मूर्तजा सदरिवाल, अधिकारी, सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्ट