मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील एका घरामध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोन महिलांचा मृत्यू झाला असून ११ जण या आगीत जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भेंडी बाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील बोहरी मोहल्ल्यातील पंजाबी महलच्या शेजारील घराला गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र क्षणाक्षणाला आगीचा भडका वाढतच होता. त्यामुळे अग्निशमन दलाने ११.२३ च्या सुमारास श्रेणी-३ची आग जाहीर केली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. अखेर पहाटे तीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीत फरिदा (वय ६०) आणि नफिसा गीतम (वय ६०) या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर चंद्रशेखर गुप्ता (वय ३६) आणि पुंडलिक मांडे (वय २७), रमेश सरगर (वय ३५) या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही अग्निशमन दलाचे कर्मचारी असून धुराचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ताहिर नालावाला (वय ७२), मुस्तफा सोनी (वय ४२), फरिदा छित्तरवाला (वय ५२), सैफुद्दीन छित्तरवाला (वय ६२), बुहराद्दीन होतालवाला (वय २९) आणि मुस्तफा हॉटेलवाला (वय ४६) आणि अली असगर (वय ३२)या रहिवाशांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhendi bazar fire two dead 12 persons rescued from building
First published on: 24-05-2019 at 10:05 IST