विद्युतदाहिनीसाठी दादर, शीव, रे रोड स्मशानभूमीचा पर्याय उपलब्ध

मुंबई : पालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही विद्युतदाहिनीचे नैसर्गिक वायूदाहिनीत रुपांतर करण्यात येत आहे. त्यामुळे ही विद्युतदाहिनी एप्रिल २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने लाकडांवर दहन करता येणार आहे. मात्र दादर (पश्चिम), शीव, रे रोड येथील स्मशानभूमींचा पर्याय उपलब्ध असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्वी भोईवाडा स्मशानभूमीत पार्थिवावर पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या चितेवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र पर्यावरण सेवांचा विचार करून सुमारे १५ वर्षांपूर्वी तेथे दोन विद्युतदाहिन्या सुरू करण्यात आल्या. अंत्यसंस्कार करण्यासाठी या विद्युतदाहिन्या सकाळपासून सुरू कराव्या लागतात. धुरांडय़ातून धूर थेट बाहेर पडतो. तसेच विद्युतदाहिनीचे संचालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व बाबींचा पालिकेने सखोल अभ्यास करून अधिक पर्यावरणस्नेही व नलिकांद्वारे उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक वायू आधारित दाहिनीमध्ये या विद्युतदाहिन्यांचे रूपांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

या नैसर्गिक वायुदाहिनीमुळे भोईवाडा स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीवर होणारा वार्षिक सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. भोईवाडा स्मशानभूमीतील वायुदाहिनी उपलब्ध होईपर्यंत, विद्युतदाहिनी आधारित सेवा ही नजीकच्या तीन स्मशानभूमींमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात चांदणेवाडी हिंदू स्मशानभूमी, चैत्यभूमीजवळ, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), दादर (पश्चिम); शीव येथील शीव हिंदू स्मशानभूमी, शीव रुग्णालय प्रवेशद्वार क्रमांक ७ समोर, भाऊ दाजी मार्ग, शीव आणि रे रोड येथील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी, ब्रिटानिया कंपनीसमोर, दारुखाना, रे रोड (पूर्व) यांचा समावेश आहे, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.