scorecardresearch

राष्ट्रवादीच्या प्रस्तावानंतर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, नवाब मलिकांकडील खात्यांचा कार्यभार ‘या’ २ मंत्र्यांकडे

राष्ट्रवादीच्या प्रस्तावानंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला. यानुसार, नवाब मलिकांकडील दोन्ही खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादीच्या २ मंत्र्यांकडे सोपवण्यात आलाय.

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यात मलिक यांच्याकडील खात्यांची जबाबदारी काढून इतरांकडे देण्याचा निर्णय झाला. याबाबत राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्तावही पाठवला. यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला. यानुसार नवाब मलिक यांच्याकडे असलेली दोन्ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर दोन मंत्र्यांकडे देण्यात आली.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिसूचना जारी केलीय. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नवाब मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे देण्याची शिफारस केली. यानुसार राज्यपालांनी मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवली आहे. याशिवाय मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार काढून तो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला.

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नेमका काय निर्णय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत.

पालमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे?

दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर परभणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मलिक यांच्याकडील जबाबदाऱ्या का काढल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल सांगताना नवाब मलिक यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. “नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा : Money laundering case : नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ

मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही काढली

मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद नवाब मलिकांकडे आहे आणि लवकरच मुंबई महापालिका निवडणुक आहे, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Big decision of thackeray government about nawab malik ministry pbs

ताज्या बातम्या