पोलिसांचा कारवाईचा इशारा; नेत्यांसह मंडळांना नोटीस

मुंबई : करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले. दुसरीकडे, पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची नुकतीच बैठक घेतली. करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. केरळमध्ये ओणम सणामुळे गर्दी वाढून करोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यात सणासुदीला गर्दी होऊ नये, यासाठी निर्बंध लागू करण्याची सूचना केली आहे. मात्र, करोना नियमांचे पालन करुन गर्दी न करता पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. मुंबईत काही ठिकाणी होत असलेल्या उत्सवात शेलार यांच्यासह अन्य नेते सहभागी होणार आहेत. घाटकोपर येथेही उत्सव साजरा करणार असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले.

ठाण्यात दहिहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. दहीहंडी साजरी करण्यावरून ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली.

नियम धुडकावून दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या मंडळांना आणि राजकीय नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांनंतरही दहीहंडी साजरी के ल्यास संबंधितांना ताब्यात घेण्याची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. राम कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.


भाजपच्या भूमिकेत विसंगती : महाराष्ट्रात

मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपने दिल्लीत मात्र शाळा सुरू करण्याबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. दिल्लीत आप सरकारच्या शाळा उघडण्याच्या निर्णयावर तेथील भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. आप सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नसल्याचा आरोप करीत भाजपने शाळा उघडण्याचा निर्णय निर्थक असल्याचे म्हटले आहे.

मानवी मनोरे न उभारण्याची सरकारची सूचना

मुंबई : दहीहंडीनिमित्त मानवी मनोरे उभारू नयेत, अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने सोमवारी केली. मात्र, ही सूचना प्रसृत करण्यात झालेला विलंब आणि त्यातील अस्पष्टतेमुळे पोलिसांना मात्र कायदा व सुव्यवस्था सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.