करोना संकटात सर्वसामान्यांसाठी बंद असणारी लोकल सेवा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करत असल्याचं जाहीर केलं. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार असून यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं असून यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती असं मत व्यक्त केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करोनाची सुरुवात झाल्यानंतर २२ मार्च २०२० ला लोकल सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही ठराविक प्रवाशांसाठी१५ जूनपासून सेवा सुरु करण्यात आली होती. रेल्वेची भूमिका कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्याला करोना स्थिती नियंत्रणात आली असेल तर केंद्राला कळवा आम्ही त्वरित जनतेच्या सेवेत रेल्वे आणू असं सांगत होते. असंही सध्या ९० टक्के फेऱ्या सुरुच आहेत,” असं रावसाहेब दानवे यांनी यावेळी म्हटलं.

१५ ऑगस्टपासून लोकल प्रवासमुभा! मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना त्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. “जनतेची सुविधा लक्षात घेतली पाहिजे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्यायचा होता तर मग हा निर्णय फार आधी घ्यायला हवा होता,” असंही ते म्हणाले.

हे क्यूआर कोड काढण्याची आणि तपासण्याची जबाबदारी कोणाची? अशी विचारणा करताना रावसाहेब दानवेंनी रेल्वेच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड आणि पास तपासले पाहिजेत असं सांगत राज्य सरकारवर जबाबदारी ढकलली आहे. “राज्य सरकारलाच ही तपासणी करावी लागणार आहे. दोन डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. सत्यता पडताळण्यासाठी रेल्वेकडे अशी कोणती यंत्रणा नाही. प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारनेच तपासण्याची योजना करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे त्यामुळे त्यांनीच ओळख पटवावी. रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल,” असं त्यांनी म्हटलं आहे. ही घोषणा फार आधी व्हायला हवी होती. पण आमच्याकडून स्वागत आहे असंही ते म्हणाले आहेत.

प्रवासासाठी काय करावं लागणार आहे –

रेल्वेसेवेसाठी राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर किंवा शहरातील महापालिकांच्या कार्यालयातून क्यूआर कोड मिळविणे आवश्यक असेल. अ‍ॅपवर लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच परवानगी पत्र मिळेल. क्यूआर कोड दाखवल्यावरच रेल्वे तिकीट खिडकीवर मासिक पास अथवा दैनंदिन तिकीट मिळू शकेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp central state railway minister raosaheb danve maharashtra cm uddhav thackeray mumbai local sgy
First published on: 09-08-2021 at 09:50 IST