मुंबई : ‘सर्वांना मोफत लस द्या’, ‘मुंबईकरांचे प्राण वाचवा’ अशा घोषणा देत भाजप नगरसेवकांनी मंगळवारी पालिका मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर निदर्शने केली. नागरिकांना लस मिळत नसल्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर व्यापक प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे आहे. गेल्या तीन दिवसांत पालिकेने लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिली अथवा दुसरी लसीची मात्रा मिळणार नाही असे घोषित केले आहे. लसीची कमतरता असल्यामुळे सर्व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण आठवडाभर बंद होते. त्यामुळे गेले १० दिवस शासकीय केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होत आहे. केंद्रावर जाणारे ज्येष्ठ नागरिकांना विशेषत: ८० वर्षांवरील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. पालिकेने तातडीने सर्वांना मोफत लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी शिंदे यांनी केली.

लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींची लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असावी, ८० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र रांग असावी, पहिली मात्रा घेणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कालबद्ध पूर्व नियोजित वेळेनुसार लस द्यावी, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना नोंदणीनंतर निश्चिात केलेल्या वेळेनुसार लस द्यावी, लसीचा पुरेसासाठा केंद्रांवर उपलब्ध करावा, सर्व लसीकरण केंद्रे किमान १२ तास आणि शक्य असेल तेथे २४ तास सुरू ठेवावी आदी मागण्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत.

आंदोलन करणार याची कल्पना दिली असती तर आपण तेथे उपस्थित राहून निवेदन स्वीकारले असते. केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने लस देत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला पुरेल इतकी लस एकरकमी पैसे देऊन घेण्याची तयारी दर्शविली आहे. भाजप नगरसेवकांनी आपल्यासोबत दिल्लीला यावे आणि पंतप्रधानांना मुंबईकरांच्या लसीसाठी विनंती करावी. आंदोलनाचे नाट्य करून मुंबईकरांची दिशाभूल करणे थांबवावे. – महापौर किशोरी पेडणेकर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp corporators agitate for vaccination akp
First published on: 05-05-2021 at 00:09 IST