मुंबई : शिवसेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला आणि मुंबई महापालिकेत आमचे दोन नगरसेवक कानिटकर आणि कोरडे हे १९५७ मध्ये निवडून आले होते. इतिहासाचा अर्थ केवढा, ज्याच्या त्याच्या समजुतीएवढा, असे नमूद करीत भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी शिवसेनेवर टीका केली.

खासदार संजय राऊत यांचा जन्म १९६१ मध्ये झाला. त्यामुळे जन्मापूर्वीचा इतिहास त्यांना माहिती नसावा. १९६१ मध्ये आमचे हशू अडवाणी नगरसेवक म्हणून निवडून आले, तर १९६७ मध्ये ते चेंबूरमधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक १९७० मध्ये परळमधून आमच्या पाठिंब्यावर निवडून आले. त्यामुळे उगाच सोईने इतिहास उगाळू नका, अशी टिप्पणी शेलार यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हिंदूुत्वाच्या विचारांसाठी युतीत आम्ही ‘गर्व से कहो’ असे म्हणत होतो; पण आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र या जाज्वल्य इतिहासाच्या फुलांचे निर्माल्य झाले, असे वाटते, अशी टीकाही शेलार यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.