दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी २०१८ मध्ये फडणवीस यांच्याकडे पत्र

मुंबई :  नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांचे पत्र उचित कार्यवाहीसाठी विमानचलन विभागाच्या सचिवांना पाठविणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच दि. बा. यांच्या नावाचा प्रस्ताव तयार करून केंद्राला पाठविला असता तर आता आंदोलनाची वेळ आली नसती, असे सत्ताधारी आघाडीत बोलले जात आहे. मात्र फडणवीस यांनी या आरोपाचा इन्कार के ला आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नामकरण करायचे नाही हा धोरणात्मक निर्णय तेव्हा झाला होता याकडे लक्ष वेधले.

नवी मुंबईतील नियोजित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे तत्कालीन खासदार अशोक चव्हाण यांनी १९ जून २०१८ मध्ये दिले होते. त्यावर फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना ७ जुलै २०१८ रोजी पत्र पाठवून सदर पत्र प्रधान सचिव (विमानचलन) यांच्याकडे उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह पाठविण्यात आल्याचे स्पष्ट के ले होते. फडणवीस यांनी तेव्हाच दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव सादर

के ला असता तर आंदोलनाची वेळ आली नसती. तेव्हा के ंद्र व राज्यात दोन्हीकडे भाजपचे राज्य होते. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला आता भाजपची नेतेमंडळी फू स देत आहेत. पण त्याच वेळी दि. बा. यांचे नाव फडणवीस यांना देता आले असते, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यावरच नामकरण करण्याचे राज्य सरकारचे धोरण होते. दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव रामशेठ ठाकूर यांनी दिला होता. पण प्रकल्पाचे काम सुरू असल्याने निर्णय घेतला नाही. या धोरणाचा भाग म्हणूनच  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ, सागरी सेतू (ट्रान्स हार्बर लिंक) अशा कोणत्याही प्रकल्पांचे नामकरण केले नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. समृद्धी महामार्गासाठी जिजामाता किं वा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचे प्रस्ताव आले होते. त्यावर मंत्रिमंडळात अनौपचारिक चर्चा होऊन काम पूर्ण झाल्यावरच नामकरणाचा विचार करण्याचा निर्णय झाला होता. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे गोंडवाना प्राणीसंग्रहालय नामकरणाबाबतही हेच ठरले होते. त्यामुळेच  विमानतळाच्या नामकरणाचा अधिकृत प्रस्ताव आणला गेला नव्हता.

काँग्रेसची भूमिका अजूनही कायम आहे का?

सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाची नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर भूमिका काय आहे, असा सवालही फडणवीस यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. मग सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे मन वळवावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे.

योग्य वेळी सर्वमान्य निर्णय – अशोक चव्हाण

नवी मुंबई विमानतळ प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसून नामकरणाचा मुद्दा राज्य सरकारपुढे चर्चेला आलेला नाही. त्यामुळे तो आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सर्वमान्य निर्णय घेतला जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.  यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना चव्हाण म्हणाले, मला २०१८ मध्ये काही शिष्टमंडळे भेटली होती. त्यांची निवेदने आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची विनंती केली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आला नव्हता, असे मला वाटते. फडणवीस यांनी तातडीने निर्णय घेतला असता, तर आज त्यावरून वाद निर्माण झाला नसता.