“बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात राज्याची हक्काची आणि मोक्याची जागा केंद्राला दिली. तसंच वाढवण बंदर प्रकल्पास विरोध असलेल्या स्थानिकांची समजूत काढत आहोत. मग, राज्याच्या विकासकामात केंद्र सरकार अडथळे का आणते, असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूर कारशेडच्या वादावर चर्चेतून तोडगा काढू या,” असं आवाहन रविवारी केंद्र सरकारला केलं. “विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विषय क्रेडिटचा नाही. विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा. प्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच. म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश. नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥,” असं शेलार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा- “उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही; फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

कांजूरचा हट्ट सोडा – फडणवीस

मेट्रो प्रकल्पावरून अपश्रेय तुमच्या वाट्याला येऊ नये, यासाठी कांजूरमार्ग येथे कारशेडचा हट्ट सोडून ती आरेला करावी. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नये, अशी हात जोडून विनंती आहे, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनसंवादात मेट्रो कारशेड वादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, मुंबईकरांनी आधीच खूप भोगलं आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नसल्याचाही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish shelar slams cm uddhav thackeray on his statement mumbai metro car shed social media jud
First published on: 21-12-2020 at 09:27 IST