शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘टाळण्याचा’ प्रयत्न करत असताना मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांनाही राज यांच्याकडून टाळी हवी आहे.
शेलार यांच्यासह भाजप नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे आणि प्रदेश भाजप अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे सारेच भाजपचे नेते राज यांच्या प्रेमात असल्यामुळे आगामी काळात उद्धव यांच्यापुढील ‘राज’कीय अडचणींमध्ये वाढच होणार आहे.
भाजपच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या नाराजीनाटय़ानंतर रालोआमधील एकएक घटक पक्षांनी भाजपला टाटा करण्याचा पवित्रा घेतला आहे.
या साऱ्यात शिवसेना हा रालोआचा जुना घटकपक्ष व भाजपचा एकमेव घट्ट मित्र असताना महाराष्ट्रात मात्र भाजपच्या भूमिकेमुळे सेना-भाजपात आगामी काळात ‘राज’कीय युद्ध पेटण्याची चिन्हे दिसत असल्याचे भाकितच सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने वर्तविले.
शिवसेनेच्या मुखपत्रातून ‘चौथा गडी नको’ अशी स्पष्ट भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडल्यानंतरही गोपीनाथ मुंडे यांनी राज व उद्धव यांनीच एकत्रितपणे निर्णय घ्यावा अशी मागणी केली तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज यांच्या कृष्णभुवन या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
मुंबई भाजपचे नव्याने अध्यक्ष बनलेले आमदार आशिष शेलार यांचे राज यांच्याशी जवळचे संबध आहेत. वांद्रे विधानसभा निवडणुकीच्यावेळी शेलार यांच्यासाठी मनसेने तेथे आपला उमेदवारही दिला नव्हता. आता शेलार यांचेही राजप्रेम उफाळून आले असून भाजपचे सर्वच नेते राजप्रेमात असल्यामुळे उद्धव यांच्यापुढे आगामी काळात चौथ्या भिडूवरून अडचणी निर्माण होणार आहेत. महायुतीत राज यांना सामावून घेण्याचा विडा नितीन गडकरी यांनी उचलला असल्यामुळे त्यांच्या आशिर्वादाने मुंबई अध्यक्षपदी विराजमान झालेले शेलार हे उद्धव यांच्या विरोधाची पर्वा न करता राज यांचा पाठपुरावा करतील.
यातील महत्त्वाची गोम म्हणजे केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी महाराष्ट्रात सेना-भाजपचे जास्तीत जास्त खासदार आणणे गरजे असून मनसेला आतापर्यंत मिळालेली मते लक्षात घेता मनसेशिवाय अधिकच्या जागा मिळणार नाहीत, पण यात मनसे वाढून सेनेचे महत्त्व कमी होईल ही भीती सेनेच्या नेतृत्वाला वाटत असावी, अशी शंका भाजपमध्ये व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2013 रोजी प्रकाशित
भाजप नेते राज ठाकरेंच्या प्रेमात!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘टाळण्याचा’ प्रयत्न करत असताना मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांनाही राज यांच्याकडून टाळी हवी आहे. शेलार यांच्यासह भाजप नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे आणि प्रदेश भाजप अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे सारेच भाजपचे नेते राज यांच्या प्रेमात असल्यामुळे आगामी काळात उद्धव यांच्यापुढील ‘राज’कीय अडचणींमध्ये वाढच होणार आहे.

First published on: 13-06-2013 at 02:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader coming close to raj thackeray