मुंबई : कृपाशंकर सिंग, हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक आदी काँग्रेस वा राष्ट्रवादीत असताना त्यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांकडून नेहमी टीका केली जायची. विधिमंडळात किंवा सभागृहाबाहेर आरोप करण्यात आले. आता हेच नेते भाजपमध्ये दाखल झाले किंवा लवकरच पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. या पाश्र्वभूमीवर भाजप नेत्यांनी केलेली विधाने किंवा भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी भाजपबद्दल केलेली विधाने याचा आढावा घेण्यात आला आहे.

गणेश नाईक : गणेश नाईक यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

हर्षवर्धन पाटील : हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री नव्हे तर निलंबन मंत्री आहेत. विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून नेहमीच केले जाते. – देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन

सहकार चळवळीत हर्षवर्धन पाटील हे सहकारमंत्री असताना बजबजपुरी माजली. पाटील यांचे खात्यावर अजिबात नियंत्रण नाही. एकनाथ खडसे, तत्कालीन विरोधी पक्षनेते

कृपाशंकर सिंग : सत्तेचा दुरुपयोग करीत कृपाशंकर सिंग यांनी कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती. दोन निवडणुकांमध्ये त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये दोन वेगवेगळे पॅन क्रमांक दिले होते. कृपाशंकर व त्यांच्या कुटुंबीयांनी खोटी कागदपत्रे सादर केली होती. अरुण देव, माजी उपमहापौर मुंबई व भाजप पदाधिकारी

कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यास मान्यता देण्यासाठी राज्याच्या महाअधिवक्त्यांचे मत मागविण्यात येईल. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री .

कृपाशंकर सिंग हे भ्रष्टाचाराचे महामेरू असून, अशा नेत्याला मुंबईच्या अध्यक्षपदी कायम ठेवणे हे काँग्रेससाठी शोभादायक नाही. भाजप प्रवक्ते

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या विरोधात केलेली काही वक्तव्ये

* भाजपचा भ्रष्टाचार कार्यकर्त्यांनी चव्हाटय़ावर आणावा.

* विदर्भातील जनतेने भाजपवर विश्वास दाखविला, पण भाजपने विदर्भाच्या विकासासाठी काय केले?

* विधिमंडळाचे कामकाज सुरळीत चालू नये, असाच भाजपचा प्रयत्न असतो. राज्यातील जनतेचे विधिमंडळाच्या कामकाजाकडे लक्ष असते हे भाजप नेत्यांनी लक्षात ठेवावे.