‘मातोश्री’वरून निरोप येताच भाजप नेत्यांची धावपळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी ‘मातोश्री’वरून विनंतीपर निरोप येताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याचा भूखंड देण्याकरिता भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. तातडीने सुधार समितीची बैठक आयोजित करून हा भूखंड बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यास मंजुरी देण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकात अडथळा निर्माण केल्याचे बालंट पालिका निवडणुकीच्या प्रचारात आपल्यावर येऊ नये म्हणून भाजपची धावपळ सुरू झाली आहे; परंतु आचारसंहिता जारी झाल्यास हा प्रस्ताव लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईमधील विविध ठिकाणच्या चार-पाच जागा निवडल्या होत्या. त्यापैकी महापौर बंगल्याच्या भूखंडाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला होता. त्यामुळे राज्य सरकारनेही महापौर बंगल्याच्या जागी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यावर शिक्कामोर्तब करीत काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती.

महापौर बंगल्याचा भूखंड पालिकेच्या ताब्यात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे तेथे स्मारक उभारण्यासाठी हा भूखंड बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त समितीच्या ताब्यात देण्याची गरज आहे. पालिकेची सुधार समिती आणि पालिका सभागृहाची त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी मैदाने, उद्याने ११ महिन्यांसाठी खासगी संस्थांना देण्याचा, वरळी येथील पुनर्विकास यासह विविध कामांचे प्रस्ताव सुधार समितीमध्ये मंजूर करण्यात आले. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याचा भूखंड विश्वस्त समितीकडे सुपूर्द करण्याच्या प्रस्तावाचा शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांना विसर पडला होता. प्रशासनाने हा प्रस्ताव लवकरात लवकर सुधार समितीमध्ये सादर करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांना करता आली असती; परंतु नगरसेवक निधीतील प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आणि उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांची खुशमस्करी करण्यात नगरसेवक गुंतले आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांवर विविध मुद्दय़ांवरून धूळफेक सुरू झाली आहे. मात्र आचारसंहिता जारी होण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी विश्वस्त समितीकडे भूखंड सादर केला जावा, अशी इच्छा ‘मातोश्री’ने व्यक्त करीत पालिकेतील आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत भाजप नेत्यांना निरोप धाडला होता. स्मारकाचा विषय संवेदनशील असल्यामुळे त्यावरून आरोप होऊ नये म्हणून भाजपने सावध पवित्रा घेत आचारसंहिता जारी होण्यापूर्वी सुधार समितीची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनानेही हा प्रस्ताव सुधार समितीकडे पाठवून दिला आहे. नियमाप्रमाणे सुधार समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यासाठी एक दिवस आधी पालिकेच्या चिटणीस विभागाला पत्र द्यावे लागते. पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समितीची बैठक आयोजित केली जाते. सुधार समितीने मंजूर केलेला प्रस्ताव पालिका सभागृहापुढे मांडण्यात येतो. सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर हा भूखंड विश्वस्त समितीच्या ताब्यात मिळू शकेल आणि स्मारकाला गती मिळेल. मात्र सुधार समितीची बैठक मंगळवारी आयोजित करण्याबाबत चिटणीस कार्यालयाला सोमवारी रात्रीपर्यंत कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही बैठक बुधवारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी आचारसंहिता जारी झाल्यास हा प्रस्ताव लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders meeting for balasaheb thackeray memorial issue
First published on: 10-01-2017 at 02:52 IST