या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे स्वत:चा कारभार सोडून फक्त प्रचारात व्यस्त आहेत आणि आज इकडे ज्यांच्या हातात देश सुरक्षित आहे अशा सनिकांचाच पेपर फुटल्याची बातमी आली, याचे कारण भाजपचे कारभारावर लक्षच नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हे निवडणुकीचे भाषण नाही, पण सत्य परिस्थिती आहे’, असेही उद्धव म्हणाले.

स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने आयोजित मुंबईत केलेल्या ‘गर्जते आई मराठी’ या कार्यक्रमावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

‘लष्करात भरती करण्यासाठी म्हणून परीक्षा घेतल्या जातात. त्यांचे पेपर फुटले व परीक्षा रद्द केल्या. पण ज्यांनी अभ्यास केला त्यांचे काय?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘मराठी माणसाला अभिमान वाटेल असे काम करू. मराठी माणसाला न्यायहक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना काम करेल’, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

‘दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी तेच विषय येतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, पण तुम्हाला अधिकार दिले आहेत. तुम्ही करा. तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना एकटीच्या ताकदीवर करून दाखवेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘माझ्यावर टीका होते की यांनी स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकले. पण शिवसेनाप्रमुखांची शिकवण होती की इंग्रजी शाळेत बोलायचं आणि घरी मराठी. त्यामुळे माझी मुलं इंग्रजीप्रमाणे मराठी उत्तम बोलतात. मॉम-डॅड नाही, आई-बाबा ही आमची संस्कृती आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maharashtra govt uddhav thackeray
First published on: 28-02-2017 at 03:11 IST