बृहन्मुंबई महापालिकेला टिपू सुलतानसंबंधी नाव देण्याबाबत कुठलाही प्रस्ताव दिला नाही. अनुमोदकाच्या ठिकाणी माझे नाव खाडोखोड करुन हाताने लिहिले, असा आरोप भाजपा आमदार अमित साटम यांनी केला आहे. या संदर्भात महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२७ डिसेंबर २०१३ ला बृहनमुंबई महापालिकेच्या सभेमध्ये एका रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव देण्याबाबत भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिला आहे. मात्र त्या प्रस्तावावर भाजपाच्या कुठल्याही सदस्यांची स्वाक्षरी नाही. महापौरांनी व्हायरल केलेल्या पत्रावर खाडोखोड करण्यात आली आहे. या संदर्भात जुहु पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून राज्याचे मंत्री असलम शेख व महापौर पेंडणेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी  आमदार साटम यांनी केली.

“माझ्या नावाने एक पत्र महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री अस्लम शेख यांच्याकडून व्हायरल करण्यात आले आहे. यामध्ये मी (अमित साटम) टिपू सुलतानच्या नाव रस्त्याला देण्यासाठी अनुमोदन दिले आहे असे त्या पत्रामध्ये म्हटले आहे. यामध्ये भाजपाचे कोणते नगरसेवक २७ डिसेंबर २०१३ या दिवशी मुंबई महानगर पालिकेच्या सभेमध्ये उपस्थित होते याची नोंद आहे. अशा प्रकारच्या पत्राचे स्वरुप महापालिकेचे नाही. त्यामुळे हे पत्र टाईप करुन व्हायरल करण्यात आले आहे. २७ डिसेंबर २०१३ च्या सभेच्या प्रस्तावामध्ये अनुमोदनाच्या ठिकाणी ज्यांचे नाव होते त्याठिकाणी खाडाखोड करुन अमित साटम असे लिहिले आहे. खाडाखोड करुन प्रस्तावामध्ये माझे नाव टाकलेले आहे. त्यामुळे मंत्री अस्लम शेख खोटे पत्र व्हायरल करुन माझी आणि भाजपाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री अस्लम शेख आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करत आहे. गेल्या २५ वर्षात वाझेगिरी करुन कोणतेही काम न केल्याने आलेले अपयश झाकण्यासाठी खोटी कागदपत्रे पुढे आणून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम शिवसेनेकडून होत आहे. पोलिसांकडून दाद मिळाली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ,” असा इशारा अमित साटम यांनी दिला आहे.

महापौर किशोरी पेडणेकरांचे उत्तर

“मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम भाजपा का करत आहे हा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. सभावृत्तांत हा आमच्या घरी नसतो. त्यामध्ये खाडाखोड झाल्याचे वाटत असेल तर नक्की त्याची शहानिशा करा आणि त्यासाठी मी पाठपुरावा करेन. खोटी कामे करणे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले नाही. त्यामुळे कितीही प्रसंग आला तरी आम्हीच खरंच बोलत राहणार. पण मुंबईच्या नागरिकांना अस्थिर करण्याचे काम करु नका आणि करायचीच असेल तर मैदानात या,” असा इशारा किशोरी पेडणेकरांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla amit satam lodges police complaint against mayor kishori pedankar and aslam sheikh abn
First published on: 27-01-2022 at 20:58 IST