भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. याकुब मेननच्या फाशीला विरोध करणारा व्यक्ती ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. पालकमंत्री होतो. तेव्हा संजय राऊत यांची बोबडी का वळली? असा सवाल शेलारांनी राऊतांना केला आहे. आशिष शेलार यांनी मंत्री अस्लम शेख यांच्यावर टिपू सुल्तान मैदानाच्या उद्घाटनावरून टीका केलीय.

मंत्री अस्लम शेख मालाडमध्ये टिपू सुल्तान मैदानाचं उद्घाटन करणार आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आपल्या संस्कृतीचा आणि हिंदुत्वाचा विसर पडला की सत्तेसाठी लाचारी म्हणजे काय करावं लागतं याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर देण्याची गरज आहे. टिपू सुल्तानाच्या नावाने वास्तू उभी राहत आहे. ज्याने याकुब मेननचं समर्थन केलंय तो मंत्री ही वास्तू उभी करतोय. ती व्यक्ती पालकमंत्री आहे. तेव्हा संजय राऊत यांची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या.”

“कार्टूनवरून टीका करायची आणि त्यावरून राग आला तर पळून जायचं”

“बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचं कार्टून जुनं आहे. ते कार्टून आज मुद्दाम प्रसारित करणं यामागे शिवसेनेच्या संजय राऊत यांचा हेतू काय आहे? कार्टून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. याला आमचा विरोध नाही. मात्र, कार्टूनवरून टीका करायची आणि त्यावरून राग आला तर पळून जायचं. हे संजय राऊत यांचं कोणतं कर्तुत्व आणि कर्तव्य आहे?” असा सवाल शेलार यांनी विचारला.

हेही वाचा : भाजपा आमदारांच्या निलंबनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, आशिष शेलारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जवळपास ५ तास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कार्टूनवरून समन्यायी भूमिका घ्यायची असेल तर तुमच्यावरील कार्टून कुणी व्हॉट्सअपवर पाठवलं तर नौदलाच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडणार. दुसऱ्याबाबत मात्र तुम्ही कार्टून पोस्ट करणार. संजय राऊत दुटप्पी भूमिका घेऊ नका. प्रमोद महाजनांच्या पायाजवळ पोहचण्याची सुद्धा तुमची अजूनही योग्यता आलीय का हा आमचा प्रश्न आहे,” असंही शेलार यांनी म्हटलं.