scorecardresearch

राणे, राणा दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का? आशिष शेलार शिवसेनेवर संतापले

“राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघालं आहे”

राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघालं आहे असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघालं आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे असं आशिष शेलार म्हणाले आहेत. अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावं बघून केली जात आहे असा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचं काम आहे. पण गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, घराशेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी यावेळी केली. आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला. सरकारने असा भेद करु नये असंही ते म्हणाले आहेत.

“राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरं तोडण्यासाठी नोटीस दिल्या जात आहेत. गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केलं नाही का? हा जाती, धर्मभेद नाही; तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे,” असं आशिष शेलार म्हणाले.

“बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता. राणे दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनिधिकृत नाहीत असं म्हणायचं आहे का? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावं बघून केली जात आहे,” असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

उत्तर प्रदेश सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार असल्यासंबंधी विचारलं असता आशिष शेलार म्हणाले की, “योगींनी उत्तर प्रदेशात लता मंगशेकरांच्या नावे चौक केला. मग हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचा सन्मान नाही का?”.

“अयोध्येतील नगरपालिकेला जागा ठरवून लता मंगेशकरांचा सन्मान करा हे सांगणारं भाजपाचं सरकार आहे. मुंबईत भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम झाला आणि श्रद्धांजलीसाठी हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वाजवली. केंद्र सरकारच्या संस्कृती विभागाने यासाठी मदत केली आणि महाराष्ट्र सरकार झोपून होतं. शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी संबधही राहिलेला नाही,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla ashish shelar shivsena bmc illegal construction in mumbai sgy

ताज्या बातम्या