”कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणं म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखं आहे.” अशा शब्दांमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, ”मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’… फुकटच्या टीमक्या..” असं देखील भातखळकर यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे. आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र निर्माण केलं. मात्र त्यांचं हे कारस्थान आपण उधळून लावलं असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधताना म्हटलं होतं.

यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून उत्तर दिलं आहे, ”कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणं म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखं आहे. त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्रद्वेष्टे कोण आहेत? याची नावं घेतली असती, तर थोडं अधिक बरं झालं असतं. परंतु कायद्याचा गैरवापर करून लोकांना आपण तुरूंगात टाकतो आहे. त्यांना मारहाण करतोय हे न ओळखण्या इतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, ”आरे कॉलनीतील कारशेडचा निर्णय योग्य वेळेला जनतेला सांगू, मग योग्य वेळ कधी येणार? तुमच्याच सरकारने नेमलेल्या सवलत समितीने आरेमध्येच कारशेड करा हे सांगितलं, यावर तुमचं उत्तर काय? या समितीची रिपोर्ट तुम्ही जनतेसाठी खुला का करत नाहीत? एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कधी देणार? शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? मंदिरं कधी उघडणार? या लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची उत्तर न देता, त्याचं लक्ष अन्य गोष्टींकडे वळण्याकरता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळला असा बागुलबुवा मुख्यमंत्री निर्माण करत आहेत.” असा आरोप देखील भातखळकर यांनी यावेळी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla atul bhatkhalkar criticizes chief minister uddhav thackeray msr
First published on: 08-11-2020 at 18:06 IST