अधिवेशन काळात मुंबईच्या प्रश्नांवर भाजपकडून सेनेची कोंडी
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न गाजत असताना मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्याच्या प्रत्येक संधीचे मुंबईतील भाजप आमदारांनी ‘सोने’ केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आमने-सामने लढण्याची वेळ आली तर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी आपल्या भात्यात असलेल्या हत्यारांचे दर्शनच भाजपने घडविल्यामुळे आता सेनेलाही सावध पावले टाकावी लागणार आहेत.
मुंबई आणि ठाणे या महापालिकांच्या वर्षभरात होऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेवून आपल्या मित्रपक्षाचेच पाय ओढण्याची संधी या अधिवेशनात भाजप आमदारांनी साधली. मोबाइल टॉवर घोटाळा, नालेसफाई घोटाळा, रस्ते घोटाळा, टॅब वाटप, वृक्षतोडी व पुनरेपणासारख्या प्रश्नांतून सेनेची कोंडी करण्याचे भाजपचे प्रयत्न लपून राहिले नाहीत. घोटाळ्यांच्या मालिकेमुळे चर्चेत असलेली मुंबई महापालिका बरखास्त करून या घोटाळ्यांची गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याच्या मागणीवरून विधान परिषदेत शिवसेना विरोधकांशी मुकाबला करीत होती, तेव्हा भाजपचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मात्र, लेखा परीक्षण अहवालातून समोर आलेल्या अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा करून सेनेची हवा काढून घेतली.
महापालिकेच्या नालेसफाई, भूलयंत्र खरेदी, रस्त्यावरील सिग्नल, जंक्शन दुरुस्ती, डेब्रिज विल्हेवाट आदी प्रकरणांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी असून काही प्रकरणात घोटाळा झाल्याचेही चौकशीत आढळून आल्याचेही रणजित पाटील यांनी मान्य केल्याने शिवसेनेची चांगलीच पंचाईत झाली. देवनारच्या कचराभूमीच्या आगीमुळे सेनेत पसरलेली अस्वस्थता लपून राहिली नव्हती. हा सेनेच्या बदनामीचा डाव आहे, असा थेट आरोप पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला होता. त्यांचा रोख विरोधी पक्षांपेक्षा भाजपकडे अधिक होता. म्हाडा रहिवाशांच्या समस्या, संक्रमण शिबिरातील रहिवाशांची घरे हे प्रश्न निवडणुकीच्या काळात प्रचाराचे कळीचे मुद्दे होतात, हे ओळखून भाजपने अधिवेशनकाळात त्या प्रश्नांना नेमका हात घातला. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काची घरे, उपनगरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण आदी मुद्द्यांवर ठोस घोषणा करून मतांची बेगमी करण्याची पावले भाजपने टाकल्याने सेनेत अस्वस्थता पसरली होती. रस्ते कामांत गैरव्यवहार करणाऱ्या ठेकेदारांवरील कारवाई, मुंबईतील मोकळय़ा जागा हडपण्याच्या दत्तक योजनेला स्थगिती हे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने गैरप्रकाराला आळा बसल्याचे भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी निक्षून सांगितले. याशिवाय मेट्रो -३ ला होणाऱ्या विरोधाकडे बोट दाखवत त्यांनी सेनेला लक्ष्य केले.

‘हा मुंबईकरांना मूर्ख बनविण्याचा प्रकार!’
हा मुंबईकर जनेतला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. पण मुंबईकर सुज्ञ आहेत. हे दोन्ही पक्ष संगनमताने पालिकेत निर्णय घेतात आणि मग एकदुसऱ्यावर आरोप करतात. भाजपने नालेसफाईचा घोटाळा बाहेर काढल्यावर दुसऱ्या दिवशी महापौरांनी आयुक्तांना रस्ते घोटाळ्याचे गोपनीय पत्र लिहिले. पुढच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढण्याची भाषा करत आहेत व त्यातून एकमेकांची लफडी, कुलंगडी बाहेर काढत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्येही त्यांनी याचप्रकारे खालच्या थरावरील राजकारण केले आहे, असा आरोप मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांनी केला.