भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली खरी. मात्र आपण जे बोलून बसलो आहोत त्यामुळे आपल्याला आपला फोन बंद करावा लागेल असे राम कदम यांना वाटले नसावे. महाराष्ट्रातील तरूणींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांचा दहीहंडी कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलेला मोबाइल क्रमांक आता ‘अनअॅव्हेलेबल’ आहे. त्यामुळे त्यांनी बंद ठेवला आहे हे उघड आहे. त्यांनी जाहीरपणे सांगितलेला मोबाइल क्रमांक डायल केला असता, ‘आपण डायल करत असलेला मोबाइल क्रमांक सध्या उपलब्ध नाही, चालू व्हॉइस टेरिफनुसार व्हॉइस मेसेज पाठवू शकता असा संदेश येतो.’

सोमवारी दहीहंडीच्या कार्यक्रमात, मी तुमची कोणतीही समस्या सोडवायला तयार आहे असे सांगताना तुम्ही जर मला सांगितले की मी मुलीला प्रपोज केला आहे ती नाही म्हणते. मग मी काय करणार? तुमच्या आई वडिलांना बोलवणार ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तुमच्यासाठी तिला पळवून आणणार. त्यासाठी लिहून घ्या हा मोबाइल नंबर असे सांगत राम कदम यांनी आपला मोबाइल क्रमांक दिला होता. 9833151912 हा मोबाइल क्रमांक त्यांनी जाहीरपणे सांगितला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून जी टीकेची झोड उठली आहे त्यानंतर त्यांनी हा फोन बंद ठेवणेच श्रेयस्कर समजले आहे. कारण त्यांचा फोन डायल केला की तो ‘अनअॅव्हेलेबल’ असल्याचे सांगितले जाते आहे.

राम कदम हे स्वतःला डॅशिंग, दयावान आमदार म्हणून संबोधतात. मतदार संघातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी हा क्रमांक दिला आहे. त्यांच्या कार्यालयातही हा क्रमांक ठळकपणे लावलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील तरूणींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पहिल्यांदाच हा क्रमांक बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती मिळते आहे. राम कदम जे बोलले ते वक्तव्य जसे व्हायरल झाले तसेच त्यांचा मोबाइल क्रमांकही व्हायरल झाला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून त्यावर फोन वाजू लागले. त्यानंतर हा मोबाइल बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती मिळते आहे.